डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:40 AM2021-09-27T04:40:07+5:302021-09-27T04:40:07+5:30
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, ...
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही. दुर्गम भागात याेजनांबाबत प्रभावी जनजागृती करणे गरजेचे आहे.
कोडसेपल्लीत नाल्यांचा अभाव
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचणीचे होत आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले
मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे. अनेक शेतकरी डिमांड भरल्यानंतर वीज मीटर उपलब्ध हाेण्यापूर्वीच ट्रान्स्फाॅर्मरवरून थेट वीज पुरवठा घेतात.
टीपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या
कुरखेडा : तालुक्यातील टीपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे. शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. टीपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्याची मागणी हाेत आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत आहे. टीपागडला अभयारण्याचा दर्जा देऊन वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करावे, अशी मागणी जाेर धरत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
उपाहारगृहांमध्ये नियमांचे उल्लंघन
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहारगृहे व हॉटेलमध्ये उघड्यावरच खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, याबाबत संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.