रामगड परिसरात फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:37 AM2021-02-10T04:37:21+5:302021-02-10T04:37:21+5:30
गंजलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका देसाईगंज : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. ते खांब कोसळून अपघात ...
गंजलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका
देसाईगंज : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. ते खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत.
ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार
गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरातील ग्रामीण भागात केरोसीनचा काळाबाजार सुरू आहे. गरीब, सर्वसामान्य कुटुंबांना केरोसीन मिळण्याऐवजी ट्रकमालकांना केरोसीन दिले जात आहे. गरिबांना केरोसीन वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांची अडचण झाली आहे.
अनेक गावांसाठी लाईनमनच नाही
आरमोरी : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमन द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याच्या बाजूला वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी
कमलापूर : जिल्ह्यात मध संकलनाला चांगला वाव आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण दिल्यास चांगल्या दर्जाचे मधसंकलन होण्यास मदत होईल. त्यामुळे मध संकलनाचे प्रशिक्षण देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
घाण पाण्याच्या गटाराने डास वाढले
गडचिरोली : स्थानिक नगरपालिका क्षेत्रात विविध वॉर्डात मोकळ्या भूखंडावरून घाण पाण्याचे डबके तसेच गटारे निर्माण झाली आहेत. या डबक्यांच्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील कन्नमवार वॉर्डात अशा प्रकारचे घाण पाण्याची गटारे अनेक ठिकाणी आहेत.
कुरखेडा तालुक्यातील पर्यटनस्थळ दुर्लक्षित
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध उधळणीने नटलेला आहे. या ठिकाणी शेकडो पर्यटन स्थळे आहेत. कुरखेडा तालुक्यातील पर्यटन स्थळाचा विकास अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे या स्थळांचा विकास करण्याची मागणी आहे.
आरोग्य उपकेंद्रातील प्रसूतिगृह नावापुरतेच
आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह बांधण्यात आले आहेत. मात्र, सदर प्रसूतिगृह अत्यंत लहान असून, या प्रसूतिगृहांमध्ये आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत.
खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले
अहेरी : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी अहेरी येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी आहे.
शेतकरी वळताहेत कुक्कुटपालनाकडे
अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहे. मात्र, ते खरेदी करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने पशुपालकांची मोठी अडचण झाली आहे.
मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
चामाेर्शी : चंद्रपूरच्या दारूबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्यातून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावांत पोहोचविली जात आहे.
बेरोजगारांना मुद्रा कर्ज योजनेचा लाभ द्या
कुरखेडा : केंद्र सरकारने बेरोजगारांना स्वयंरोजगार स्थापित करण्याच्या उद्देशाने मुद्रा लोन योजना या संकल्पनेच्या माध्यमातून कमी व्याज व कमी कागदपत्रावर कर्ज देण्याची योजना सुरू केली. मात्र, या योजनेंतर्गत कर्ज देण्यास जिल्ह्यातील अनेक बँका चालढकल करीत आहेत. त्यामुळे बेरोजगार त्रस्त झाले आहेत.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने सिंचन व्यवस्था अपुरी आहे.