प्रवाशांच्या वर्दळीने फुलू लागली एसटी बसस्थानके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 05:00 AM2020-09-06T05:00:00+5:302020-09-06T05:00:00+5:30
केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची सक्ती रद्द केल्यानंतर एसटीची चाके पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहेत. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढविली जात आहे.
केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते. त्यामुळे बसला मर्यादीतच प्रवाशी मिळत होते. परिणामी बसफेऱ्याही मर्यादीत प्रमाणातच सोडल्या जात होत्या. २ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासाची बंधने पूर्णपणे काढण्यात आली आहेत. तेव्हापासून एसटीची गरज नागरिकांना निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांची दुसऱ्या जिल्ह्यातील कामे थांबली होती. प्रवासाची बंधने हटविल्यानंतर ही कामे करण्यास वेग आला आहे. तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठीही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अधिक बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोली आगारातून शनिवारी नागपूरसाठी १०, चंद्रपूरसाठी १४, यवतमाळ १, चामोर्शी-मुलसाठी काही फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जवळपास १०० फेऱ्या सोडल्या जात आहेत. सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरूवात होणार असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुन्हा फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.
१५ टक्के उत्पन्न व फेऱ्या
आंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊनपूर्वी गडचिरोली आगारातून दरदिवशी ६२० बसफेऱ्या सोडल्या जात होत्या. त्यातुन जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता जवळपास १०० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यातून १ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून नागपूरसाठी पुन्हा फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फेºया जरी वाढल्या तरी उत्पन्न वाढीवर मर्यादा येणार आहेत. सध्या ४० ते ४५ एवढे भारमान मिळत आहे.