एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:29 AM2019-07-20T00:29:41+5:302019-07-20T00:30:16+5:30
मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : मानव विकास मिशन योजनेतून एसटी महामंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा करण्यात आली आहे. मात्र शाळेच्या वेळेवर बस पोहोचत नसल्याने तसेच शाळेजवळ थांबा देण्यात आला नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचण्यास अडचण येत आहे.
मानव विकास मिशनच्या बसगाड्या शाळेच्या वेळेत सोडण्यात याव्या. तसेच शाळेजवळ बसथांबा देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना वेळेवर शाळेत जाता यावे, यासाठी शासनाच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत बसगाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. या बसगाड्यांच्या वाहतुकीचा खर्च सरकार देत आहे. सदर बसगाड्यांमध्ये केवळ विद्यार्थ्यांनीच प्रवास करावा, असे असताना एसटी महामंडळाने मनमानी कारभार सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बसगाड्यातून प्रवाशी खचाखच भरून नेले जातात. याचा विद्यार्थ्यांना बऱ्याचदा फटका बसतो.
काही बसथांब्यावर विद्यार्थी बसची प्रतीक्षा करीत असताना बसगाडी थांबविली जात नाही. परिणामी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाही. एकूणच महामंडळाकडून नियमाला बगल दिली जात आहे. धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये प्रवेश असलेले १६० विद्यार्थी बाहेर गावावरून ये-जा करीत असतात.
सदर शाळेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी आहे. मात्र धानोरा तालुक्यात अनेक मार्गावर या वेळेत बस फेरी नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेत वेळेवर पोहोचत नाही. सायंकाळी शाळा सुटण्याअगोदर बसेस निघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धानोराच्या बसस्थानकावर सायंकाळी ७ वाजेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी त्यांना घरी पोहोचण्यास उशीर होतो. अशा वेळी बाहेरगावावरून ये-जा करणाºया मुलींना छेडछाड व इतर प्रकारचा धोका होण्याची शक्यता आहे.
बसथांबा व बसफेरी शाळेच्या वेळेत सोडण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याध्यापकांच्या वतीने ६ जुलै रोजी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापकांना देण्यात आले होते. त्यावेळी व्यवस्थापकाने सकारात्मक प्रतिसादही दर्शविला होता. मात्र विद्यार्थी व पालकांच्या मागणी पूर्ण करण्यात आली नाही.
असे हवे वेळापत्रक
धानोरावरून गडचिरोलीकडे जाणारी सायंकाळी ४.४५ वाजताची बस ५.१५ वाजता सोडण्यात यावी, धानोरा-मुरूमगाव-कोटगूल ही बसफेरी ४.३० वाजता ऐवजी सायंकाळी ५.१५ वाजता धानोरा येथून सोडण्यात यावी, अशा पध्दतीचे वेळापत्रक महामंडळाच्या गडचिरोली आगाराने केल्यास विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होईल. मुरूमगाववरून येणारी बस धानोरा येथे शाळेजवळ थांबविण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांची आहे.