एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By admin | Published: October 21, 2016 01:16 AM2016-10-21T01:16:57+5:302016-10-21T01:16:57+5:30
स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी
निवेदन : एसटी बँक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी
गडचिरोली : स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे गडचिरोली येथील विभागीय कार्यालयासमोर गुरूवारी दुपारी १२ वाजता धरणे आंदोलन करण्यात आले. यातील दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्टेट ट्रॉन्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेला २०१५-१६ या वर्षात ११ कोटी ४२ लाख ९५ हजार ४५४ रूपयांचा नफा झाला होता. बँकेच्या संचालक मंडळाचा भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभारामुळे यावर्षी लाभांश वाटप करण्यावर विदर्भ बँकेने निर्बंध घातले आहेत. बँकेच्या सभासदांना दरवर्षी १५ टक्के लाभांश देण्याची परंपरा आहे. परंतु बँकेतील आंतर शाखा व्यवहाराचे समायोजन पूर्ण झाले नसून या खात्यामध्ये डेबीट बाजूस ८९.४९ कोटी रूपयांचा ताळमेळ अद्यापपर्यंत लागलेला नाही. तसेच बँकेच्या स्वारगेट, दापोडी, कोल्हापूर व मुंबई या शाखांसाठी रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग व्यवसाय करण्यासाठी परवाना घेतला नाही. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मंजूर करून देण्यात आलेल्या रोखपत मर्यादेसाठी रिझर्व्ह बँकेची पूर्व परवानगी घेतली नाही. या सर्व कारभाराची चौकशी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वर्कर्स काँग्रेस संघटनेने धरणे आंदोलन केले.
या आंदोलनाला गोंडवाना एसटी कामगार संघटनेनेही पाठिंबा दर्शविला. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनेचे विभागीय अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात इंटक संघटनेचे विभागीय सचिव लक्ष्मीकांत चौधरी, कार्याध्यक्ष सुनील खोब्रागडे, विलास भुरसे, राजू आखाडे, राजू चौधरी, जयंत तनगुलवार, मंगेश कुंभारे, शरद जांभुळकर, पवन वनकर, जे. टी. खोब्रागडे, किशोर लिंगलवार, विवेक फाये, अमित ठाकूर, विलास दुधे, सूर्यवंशी कुळमेथे, किशोर वानखेडे, ढोके, मडावी, अर्चना घडीकर, ताराबाई लेनगुरे, वंदना म्हस्के, गोंडवाना एसटी कामगार संघटनेचे महासचिव बंडू तिलगामे, विभागीय अध्यक्ष भास्कर आत्राम यांच्यासह इतर एसटी कामगार सहभागी झाले होते. (नगर प्रतिनिधी)