एसटीला ११ कोटी १६ लाखांचे उत्पन्न
By admin | Published: October 5, 2016 02:10 AM2016-10-05T02:10:50+5:302016-10-05T02:10:50+5:30
शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे.
शाळकरी मुलींसाठी अहिल्याबाई होळकर प्रवास योजना
गडचिरोली : शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता पाच ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत एप्रिल, जुलै, आॅगस्ट २०१६ या तीन महिन्याच्या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली विभागाला एकूण ११ कोटी १६ लाख ८ हजार ४०२ रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यातून गडचिरोलीचा एसटी विभाग मालामाल झाला आहे.
राहत्या गावापासून पाच किमी अंतरापेक्षा अधिक अंतरावर असलेल्या शाळेच्या गावी ये-जा करून विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत अहिल्याबाई होळकर मोफत बससेवेची योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन इयत्ता पाच ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थिनी बाहेरगावातील शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. सदर योजना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविले जात आहे.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य परिवहन महामंडळाचे सहकार्य घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात अहेरी व गडचिरोली आगारामार्फत विद्यार्थिनींना या योजनेंतर्गत मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१६ च्या एप्रिल महिन्यात एकूण ३ हजार ७५ विद्यार्थिनींनी एसटीचा मोफत प्रवास केला. या प्रवासापोटी राज्य शासनाकडून गडचिरोलीच्या एसटी विभागाला २० लाख ६३ हजार ७२० रूपयाचे उत्पन्न मिळाले. सन २०१६-१७ च्या शैक्षणिक सत्रातील जुलै महिन्यात ६ हजार ८२५ विद्यार्थिनींनी स्वगावापासून शाळेच्या गावापर्यंत मोफत प्रवास केला. यातून गडचिरोली एसटी विभागाला ४४ लाख ९२ हजार २९ रूपयाचे उत्पन्न मिळाले. आॅगस्ट महिन्यात ६ हजार ९३६ लाभार्थी विद्यार्थिनींच्या प्रवासातून ४६ लाख १२ हजार ६५३ रूपयांचे उत्पन्न प्रतिपुर्ती मुल्यातून गडचिरोली एसटी विभागाला मिळाले. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली एसटी विभागाला निळ्या रंगाच्या स्वतंत्र बसेस देण्यात आल्या आहेत. विद्यार्थिनींसाठीच्या सदर बसफेऱ्या शहरी भागासह ग्रामीण व दुर्गम भागात पोहोचत आहेत. शासनाच्या योजनेमुळे राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यवधी रूपयाचा नफा मिळत आहे. याशिवाय खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व महाविद्यालयाच्या सहलीतूनही गडचिरोली आगाराला लाखो रूपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
शासनाकडे अनुदान प्रलंबित; महामंडळ अडचणीत
राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत शालेय विद्यार्थिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस सुविधा पुरविली जाते. या सेवेपोटी शासनाला राज्य परिवहन महामंडळाकडे विद्यार्थिनींचे प्रतिपुर्ती मुल्य हे प्रवास खर्च म्हणून अदा करावे लागतात. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे शासनातर्फे सदर प्रवासाचे प्रतिपूर्ती मुल्य अदा केले जाते. मात्र शासनाकडे परिवहन महामंडळाचे लाखो रूपयाचे प्रतिपुर्ती मुल्य शिल्लक असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला प्रसंगी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते.