दुसऱ्या दिवशीही एसटीची सेवा हाेती ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:42+5:30
दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दाेन्ही आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती दर्शवीत आंदाेलनात सहभाग घेतला. दाेन्ही आगारातून रविवारी एकही बसफेरी साेडण्यात आली नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शनिवारपासून सुरू केलेले कामंबद आंदाेलन रविवारीही सुरूच हाेते. त्यामुळे गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगाराची बससेवा सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प पडली हाेती. दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले.
गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे या आंदाेलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी दाेन्ही आगारांतील एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती दर्शवीत आंदाेलनात सहभाग घेतला. दाेन्ही आगारातून रविवारी एकही बसफेरी साेडण्यात आली नाही.
सध्या दिवाळीनिमित्त बाहेर गावी गेलेले नागरिक आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. आगारात एकही बस नसल्याने त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. चंद्रपूर, नागपूर तसेच तालुका मुख्यालयांकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी झाली हाेती. आंदाेलनामुळे एसटी बसस्थानकांवर दिवसभर शुकशुकाट पसरला हाेता.
दिवाळीच्या कमाईवर फेरावे लागत आहे पाणी
दिवाळीच्या सणानिमित्त एसटीला बरेच प्रवाशी मिळत असल्याने याला गर्दीचा हंगाम म्हटले जाते. मात्र आंदाेलनामुळे या उत्पन्नावर पाणी फेरावे लागत आहे. हे आंदाेलन आणखी किती दिवस सुरू राहणार हे अनिश्चित आहे. ताेडगा न निघता आंदाेलन पुढेही सुरू राहिल्यास दिवाळीच्या कमाईवरही पाणी फेरणार आहे.