एसटीचा विद्यार्थ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:45 PM2017-10-02T23:45:05+5:302017-10-02T23:45:20+5:30
शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा असलेल्या गावापर्यंत जाणे-येणे सोयीचे व्हावे, दरम्यान त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उदात्त हेतूने शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बससेवा सुरू केली. मात्र आरमोरीवरून सुटणारी बस तब्बल अडीच तास उशिरा आरमोरीच्या बसस्थानकावर आली, तेव्हापर्यंत विद्यार्थी बसस्थानक परिसरात बसची प्रतीक्षा करीत होते. सदर प्रकार २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आला.
सदर प्रकारामुळे राज्य परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्त ऐरणीवर आला आहे. रवी, अरसोडा, मुल्लुरचक आदी गावातील विद्यार्थ्यांना आरमोरी तालुका मुख्यालयी शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत बससेवा सुरू करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी शुक्रवारला सायंकाळी ५ वाजता शाळेची सुट्टी झाल्यानंतर ये-जा करणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. बसची प्रतीक्षा करू लागले, मात्र बस बसस्थानकावर आली नाही. त्यानंतर रात्री ७.४५ वाजतापर्यंत बस न पोहोचल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. याबाबतची माहिती काही नागरिकांनी शिक्षकांना दिली. तत्काळ शिक्षक बसस्थानकावर हजर झाले. त्यानंतर सामाजिक व भाजप कार्यकर्ते पंकज खरवडे व नंदू नाकतोडे बसस्थानकावर पोहोचले. त्यांनी गडचिरोलीच्या आगार प्रमुखांना संपर्क केला, मात्र फोन बंद होता. त्यानंतर खासगी बसची व्यवस्था करीत असताना महामंडळाची बस ७.५५ वाजता पोहोचली. यावेळी बसचालकाना विचारणा केली असता, गडचिरोलीवरून बस उशिरा सुटल्याने आरमोरीत बस पोहोचण्यास विलंब झाला, असे सांगितले. चुकीच्या व्यवस्थापनामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजयुमोचे अध्यक्ष पंकज खरवडे, नंदू नाकतोडे, शिक्षक मनोज मने, सतीश धाईत, हितकारिणी विद्यालयाचे मुख्याध्यापक शालिकराम राऊत, जितेंद्र ठाकरे, स्वप्नील धात्रक, सौरभ जक्कनवार, रोहित धकाते, युगल सामृतवार, गोलू वाघरे, संजय सोनटक्के आदींनी केली आहे. सदर प्रकाराबाबत विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बसस्थानकात पाणी, सुविधांचा अभाव
आरमोरी येथील बसस्थानकावर प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी या बसस्थानकावर बस पकडण्यासाठी आले. मात्र तब्बल अडीच तास बस बसस्थानकावर पोहोचली नाही. पाणी न पिता विद्यार्थ्यांना येथे ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे यावेळी अर्धा किमी अंतरावरील हॉटेलमधून विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी आणावे लागले. कोट्यवधी रूपये खर्च करून या बसस्थानक इमारतीत अनेक सुविधांचा अभाव आहे.