रेल्वे आरक्षण केंद्रावरही दलालांचा सुळसुळाट
By admin | Published: June 18, 2014 12:12 AM2014-06-18T00:12:35+5:302014-06-18T00:12:35+5:30
गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची
गडचिरोली : गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गडचिरोली हा राज्यातील मागास व दुर्गम जिल्हा आहे. येथील नागरिकांना येथे आरक्षण तिकीट घेण्यासाठी चंद्रपूर किंवा वडसा येथे जावे लागत होते. येथील नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गडचिरोली येथे रेल्वे आरक्षण केंद्र देण्यात आले. येथून पुणे व मुंबई तसेच इतर ठिकाणसाठीच्या प्रवासाची तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिकीटचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची संख्याही वाढली आहे. २५ ते ३० वयोगटातील हे मुले १० ते १२ च्या संख्येने पहाटे ४ वाजतापासून रेल्वे आरक्षण केंद्रावर उपस्थित राहून एका कागदावर स्वत:चे नाव लिहून आपला रांगेत पहिला नंबर लावतात. त्यांचे एकमेकासोबत संगनमत असून आळीपाळीने तेच तिकीट काढतात. त्यांचे ओळखपत्र घेऊन तत्काळ तिकीटही ते मिळवितात. तिकीट देणारे रेल्वे कर्मचारी व दलाल यांच्यात वाटाघाटी असून दलालांकडून ठराविक रक्कम घेतली जाते. तिकीट देणारा रेल्वे कर्मचारी या दलालांना नावानिशी ओळखतो, अशी माहिती रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा महासचिव विजय शेडमाके यांनी लोकमतला दिली आहे. या दलालांचे रोजचे काम असल्याने त्यांना कमी वेळात जास्तीतजास्त पैसे या कामात मिळतात. अन्य प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा वापरून ते गुंडागर्दीही येथे करीत असतात.
एका कोऱ्या कागदावर स्वत:चे नाव लिहून प्रथम क्रमांक लावणाऱ्या या लोकांना कन्फर्म तिकीट दिले जाते. इतरांचा नंबर येईपर्यंत वेटींग तिकीट सुरू होते. या प्रकाराबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने दलालांचे फावत आहे व आरक्षण केंद्राचा सर्वसामान्य फायदा मिळणे कठीण झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)