कर्मचाऱ्यांची मुख्यालयाला दांडी; इमारतींवर उगवली झाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:29+5:302021-09-16T04:45:29+5:30
आरमाेरी येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयातील सौदामिनी व तेजस्विनी नावाच्या आकर्षक इमारती काही वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या. बरीच वर्षे येथे ...
आरमाेरी येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयातील सौदामिनी व तेजस्विनी नावाच्या आकर्षक इमारती काही वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या. बरीच वर्षे येथे कर्मचारी वास्तव्यास हाेते. हळूहळू कर्मचारी मुख्यालयाला खाे देत गेले. गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कंपनीतील अधिकारी, अभियंता व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयाला पाठ दाखविल्याने सौदामिनी व तेजस्विनी या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले. सध्या येथे गवत आणि काडीकचरा उगवलेला आहे. सोबतच इमारतींमधील किरकोळ वस्तूंची तूटफूट झाली आहे. कंपनीला काेट्यवधी रुपयांचे बिल मिळवून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची ही दुरवस्था पाहून नागरिकांमध्येही संताप व्यक्त हाेत आहे. झाडाझुडपांमुळे विद्युतसंबंधी तक्रारी व निवेदन घेऊन जाणाऱ्या नागरिकांना साप, विंचू व अन्य सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाॅक्स
दुरुस्ती केव्हा हाेणार?
विद्युत अभियंता व कर्मचाऱ्याच्या निवासासाठी निर्माण केलेल्या इमारतींमध्ये सर्व सोयीसुविधा हाेत्या. एका इमारतीमध्ये १० कुटुंबाचे वास्तव्य राहील, अशी क्षमता हाेती. परंतु, देखभाल व दुरुस्तीअभावी काेट्यवधी रुपयांच्या इमारतींची दुरवस्था झाली. वीज कंपनीचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी हजाराे रुपयांची भाड्याची खाेली करून आरमोरी येथे वास्तव्य करीत आहेत. परंतु, इमारतीच्या दुरुस्तीबाबत कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. या इमारतींची दुरुस्ती केव्हा हाेणार, असा सवाल काही कर्मचारी व नागरिकांनी केला आहे.