पेंढरी तालुका निर्मितीसाठी ग्रामसभांचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 01:39 AM2019-02-21T01:39:02+5:302019-02-21T01:40:23+5:30
धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरी हे गाव व परिसर विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र पेंढरी तालुक्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी बुधवारी पेंढरी येथे सुमारे ५० ग्रामसंभामधील हजारो नागरिकांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेंढरी : धानोरा तालुका मुख्यालयापासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले पेंढरी हे गाव व परिसर विकासापासून कोसो दूर असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र पेंढरी तालुक्याची निर्मिती करावी, या मागणीसाठी बुधवारी पेंढरी येथे सुमारे ५० ग्रामसंभामधील हजारो नागरिकांनी मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात आबालवृदधांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
५० गावांमधील महिला व पुरुष ढोल, ताशांच्या निनादात आदिवासी नृत्य करीत पेंढरी येथे पोहचले. येथे आदिवासी परंपरेनुसार थोर महात्म्यांना वंदन करण्यात आले. तसेच झुरू गावडे व मैनू धुर्वे यांच्या नेतृत्वात ध्वजारोहण करण्यात आले.
‘मावा नाटे मावा राज’, ‘ना विधानसभा ना लोकसभा, सबसे उँची ग्रामसभा’, ‘पेंढरी तालुक्याची निर्मिती झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत हजारो नागरिकांनी पेंढरी-जारावंडी क्रॉसिंगवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान दोन रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पवन येरमे, शाम मिर्झा, संयुक्त गाव गणराज्य ग्रामसभा परिषदेचे अध्यक्ष देवसाय आतला, माजी पंचायत समिती सभापती रामेश्वरी नरोटे, पंचायत समिती सदस्य रोशनी पवार, माजी सरपंच अरुण शेडमाके, माजी सरपंच बावसू पावे, दुगार्पूरच्या सरपंच मनिषा टेकाम, झाडापापडाच्या सरपंच प्रियंका नाईक, मसरु तुलावी, बारसू दुग्गा, दिनेश टेकाम, छबिलाल बेसरा, रुपेन नाईके यांच्यासह ग्रामसभा, महिला ग्रामसंघाचे प्रतिनिधी व गावकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
यावेळी सर्वांनी सांगितले की, धानोरा या तालुका मुख्यालयापासून पेंढरी गावाचे अंतर ६५ किलोमीटर आहे. दळणवळणाची साधने नसल्याने शासकीय कामाकरिता धानोरा येथे गेल्यास मुक्काम करण्याची वेळ येते. २० ते ३० वर्षांपूर्वी झालेला मुख्य रस्ता उखळला असून, त्याची डागडुजी केली जात नाही.
दळणवळणाची साधने नाहीत. टीएसपीचा निधी कुठे जिरतो, हे कळायला मार्ग नाही असा आक्रोश यावेळी व्यक्त करण्यात आला.
आंदोलन सुरु असताना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास धानोरा येथील नायब तहसीलदार दामोधर भगत आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन मागण्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, मागण्यांसंदर्भात प्रशासनाने तत्काळ पावले उचलली नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
टप्प्याटप्प्याने तीव्र करणार आंदोलन
पेंढरी परिसराच्या विकासाकरिता स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करावी, अन्यथा २१ फेब्रुवारीला बाजारपेठ बंद, २२ ला शासकीय कामे बंद, २३ ला तालुकास्थळी मोर्चा, २४ ला जिल्हा मुख्यालयावर मोर्चा, २५ पासून साखळी उपोषण व १ मार्चला जेलभरो आंदोलन करण्यात येईल, शिवाय लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला जाईल, असा इशारा ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी दिला.