गडचिराेली : स्वागतासाठी उभा राहताे, कार्यक्रमाची शाेभा वाढविताे; पण ताे पुतळा नव्हे!
By गेापाल लाजुरकर | Published: April 19, 2023 06:10 PM2023-04-19T18:10:40+5:302023-04-19T18:10:50+5:30
एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे.
गडचिराेली - एक तरी कला असावी अंगी, असे म्हटले जाते. प्राचीन काळापासून कला हे मानवी जीवनाचे अंग बनले आहे. एखादा जिवंत व्यक्ती डोळ्यांची पापणी न हलवता, गुदगुल्या लावल्यानंतरही हालचाल न करता पुतळ्याप्रमाणे तीन तास स्थिर उभा राहत असेल तर ती एक कलाच आहे. अशी कलासुद्धा मानवाला आकर्षित करू शकते. हीच कला आज रोजगाराचे साधन बनली आहे. ताे स्वागतासाठी उभा राहताे, कार्यक्रमाची शाेभा वाढविताे; पण ताे पुतळा नव्हे, तर व्यक्ती हाेय.
देसाईगंज तालुक्याच्या कोकडी येथील एक व्यक्ती लग्नसमारंभात पोटासाठी जिवंत माणसाचा पुतळा बनून लाेकांच्या स्वागतासाठी उभा राहतो. त्या व्यक्तीचे नाव आहे विजय टिकले. ५२ वर्षांचा हा कालावंत २०१६ पासून समारंभांमध्ये लाेकांच्या स्वागताचे काम करीत आहे. शारीरिक उंचीने लहान असल्याने ही त्याची अंगभूत कला आता त्याच्या उत्पन्नाचे साधन बनले आहे. आरमोरी येथे मागील आठवड्यात झालेल्या स्वागत समारंभात मुख्य प्रवेशद्वारावर उभे राहून विजय टिकले पुतळा बनवून लाेकांचे मनोरंजन करीत होते. त्यांची ही कला आता पाेटापाण्याचे साधन बनली आहे. समारंभात येणारे पाहुणे टिकले यांची स्वागत करण्याची कला पाहतच असतात. काही क्षण तरी ते प्रवेशद्वारावर थांबल्याशिवाय राहत नाही.
किती मिळते मानधन?
विवाह समारंभ, वाढदिवस, स्वागत समारंभ आदी कार्यक्रमांत पाहुण्यांच्या स्वागतासाठी विजय टिकले यांना बाेलाविले जाते. वर्षभर टिकले यांच्या तारखा बुक असतात. शिक्षण कमी असले, तरी आपल्यात कलागुण असले तरा माणूस उपाशी राहत नाही, याचेच उदाहरण म्हणजे विजय टिकले हे आहेत. समारंभातील ३ तासांकरिता एक ते दीड हजार रुपये मानधन विजय टिकले हे घेतात.
परजिल्ह्यातही स्वागत; आतापर्यंत ४०० वर कार्यक्रम
विजय टिकले यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. यासाेबतच त्यांच्याकडे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. स्वागत करण्याची त्यांची कला पाहून देसाईगंज पं.स.चे माजी सभापती परसराम टिकले यांनी त्यांना पाेशाख उपलब्ध करून दिला. सुरुवातीला अतिशय कमी मानधनावर त्यांनी आपली कला दाखविली. प्रतिसाद वाढल्यानंतर यात काही प्रमाणात वाढ केली. आतापर्यंत त्यांनी विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आदी जिल्ह्यांसह मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतील काही ठिकाणी कला दाखवीत एकूण ४०० वर कार्यक्रम केले आहेत.