५३ गावात धान्य पोहोचविण्यास प्रारंभ
By Admin | Published: June 2, 2017 01:03 AM2017-06-02T01:03:29+5:302017-06-02T01:03:29+5:30
तालुक्यातील दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात दोन ते तीन महिने गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो.
भामरागड तालुका : पावसाळा सुरू होण्यापूर्वी महसूल विभागाचे नियोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यातील दुर्गम गावात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात दोन ते तीन महिने गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलेला असतो. अशा स्थितीत धान्य वितरण करताना अडचणी येऊ नयेत. याकरिता भामरागड येथे दरवर्षीच चार महिन्याचे धान्य सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत पावसाळ्यापूर्वी पोहोचविले जाते. यंदा ५३ गावांसाठी चार महिन्यांचे धान्य भामरागड येथून दुर्गम गावांत पोहोचविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
भामरागड येथे धान्य पोहोचविल्यानंतर तालुक्यातील दुर्गम व अतिदुर्गम गावांमध्ये धान्य पोहोचविले जाते. ३१ मे रोजी तालुक्यातील बिनागुंडा येथे नवसंजीवन योजनेंतर्गत धान्य पोहोचविण्यात आले. तालुक्यातील अतिदुर्गम गावांमध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी धान्य दरवर्षीच पोहोचविले जाते. यावर्षी भामरागड तालुक्यातील २२ पावसाळी केंद्रांतर्गत येणाऱ्या ५३ गावांसाठी चार महिन्यांचे धान्य पोहोचविण्याचे काम सुरू आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत तालुक्यातील गावांमध्ये धान्य पुरवठा करण्यासंदर्भात काम सुरू आहे. तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या समक्ष तहसीलदार कैैलास परमेश्वर अंडिल यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक ए. टी. भंडरवाड धान्याचे वितरण करीत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात तीन ते चार महिने दुर्गम गावातील तालुका मुख्यालयाचा संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे या गावांमध्ये धान्य पोहोचविणे शक्य होत नाही. या भागातील नागरिक पावसाळ्यापूर्वी आवश्यक सामग्रीही स्वत: नेतात. त्यामुळे त्यांनाही पावसाळ्यासाठी विशेष व्यवस्था करावी लागते. यंदा नागरिकांची लगबग सुरू झालेली आहे.