खरीप हंगामातील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:39 AM2021-05-20T04:39:23+5:302021-05-20T04:39:23+5:30
वैरागड : आदिवासी विकास महामंडळाने मागील वर्षात मे महिन्याच्या अखेरीस रब्बी हंगामातील धान खरेदीस सुरुवात केली होती. या वर्षात ...
वैरागड : आदिवासी विकास महामंडळाने मागील वर्षात मे महिन्याच्या अखेरीस रब्बी हंगामातील धान खरेदीस सुरुवात केली होती. या वर्षात देखील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी देलनवाडी येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे व्यवस्थापक दिलीप कुमरे यांना घेराव करून महामंडळाच्या गडचिरोली येथील प्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदन दिले.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत पूर्व विदर्भातील खरेदी केंद्रावर हमीभावाने खरीप हंगामात धान खरेदी करण्यात आली. खरीप हंगामात धानाची उचल न झाल्याने यंदा रबी हंगामातील खरेदी अडचणीत आली आहे. खासगी व्यापारी प्रति क्विंटल रुपये १३०० ते १४०० पर्यंत एवढ्या कमी भावात खरेदी करीत आहेत. या भावात शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा भरून निघणे कठीण बनले आहे. त्यामुळे मागील खरीप हंगामातील धानाची उचल करून रब्बीची धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळाव्यात, यासाठी देलनवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाला घेराव घातला. त्यानंतर ४३ शेतकऱ्यांच्या सह्या असलेले लेखी निवेदन आविका व्यवस्थापकाच्या मार्फतीने महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना पाठविले आहे.