सिरोंचा तालुक्यातील धान खरेदी केंद्र सुरू करा
By Admin | Published: May 23, 2014 11:50 PM2014-05-23T23:50:19+5:302014-05-23T23:50:19+5:30
अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव
गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील सिरोंचा तालुक्यातील संपूर्ण धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी अहेरीचे आमदार दीपक आत्राम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्याकडे शुक्रवारी मुंबई येथे केली आहे. नामदार पिचड यांची आमदार दीपक आत्राम यांनी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तीन नद्या बारमाही वाहणार्या आहेत. त्यामुळे या तालुक्यात वर्षातून दोन वेळा शेतकरी धानाचे पीक घेतात. परंतु आदिवासी विकास महामंडळामार्फत संपूर्ण तालुक्यात धान खरेदी वर्षातून एकदाच करण्यात येते. दुसर्यांदा शेतकर्यांनी घेतलेल्या धान पिकाची खरेदी आदिवासी विकास महामंडळ करत नाही. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना आपले धान पीक व्यापार्यांना अत्यल्प किमतीत विकावे लागते व शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. अनेक शेतकरी आपला माल आंध्रप्रदेश राज्यात विक्रीसाठी नेतात. यासाठी शेतकर्यांना आर्थिक भुर्दंडही पडतो. आंध्रप्रदेशात पडेल भावाने मालाची विक्री करावी लागते. एक ते दोन दिवस यासाठी मोडतात. सिरोंचा तालुक्यातील शेतकर्यांची ही अडचण लक्षात घेऊन या तालुक्यात तत्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्याकडे केली. त्यानंतर नामदार पिचड यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत तत्काळ आदिवासी विकास महामंडळाची बैठक बोलावून या संदर्भात निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सिरोंचा तालुक्याकरिता खरेदी केंद्र सुरू होईल, अशी माहिती आमदार दीपक आत्राम यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)