इल्लूर येथील पेपर मिल सुरू करा
By admin | Published: October 17, 2016 02:11 AM2016-10-17T02:11:36+5:302016-10-17T02:11:36+5:30
इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
निवेदन : चार महिन्यांपासून कारखाना बंद
आष्टी : इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. इल्लूर पेपर मिलमधील समस्या सोडवून तत्काळ पेपर मिल सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन कामगारांनी भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पेपरमिल बंद राहण्यासाठी व्यवस्थापन जबाबदार आहे. मागील अनेक वर्षांपासून पेपर मिल व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे व मालकाचे व्यवस्थापनावर नियंत्रण नसल्यामुळे येथील व्यवस्थापन आपल्या मनमर्जीने कारभार करीत आहे. त्याचे परिणाम येथील कामगारांना सोसावे लागत आहे. बहुतांश कामगार या पेपर मिलच्या भरवशावरच आपले जीवन जगत आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून पेपर मिल बंद असल्याने कामगारांचे वेतनही थकले आहे. परिणामी कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकार, राज्य सरकार व पेपर मिलच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून इल्लूर येथील पेपर मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विरजेश उपाध्याय यांनी दिले.
निवेदन देतेवेळी भारतीय मजदूर संघाचे शैलेश गुजे, मनोहर साळवे, राजनाथ कुशवाह, विनायक जंगमवार, अनंत प्रधान, भास्कर राऊत, दयाराम कामडी, गजानन किरणापुरे, राजेंद्र पातर, मोहन जोरगलवार, गिरीधर बामनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)