दप्तराच्या ओझ्यातून मुक्तीसाठी उपाययोजना सुरू
By admin | Published: December 31, 2015 01:34 AM2015-12-31T01:34:36+5:302015-12-31T01:34:36+5:30
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विद्यमान राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे.
गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखांना दिली जबाबदारी : खासगी इंग्रजी शाळांमध्ये दप्तराचे वजन शिक्षण विभागाने तपासले
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विद्यमान राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात काही प्रमाणात सुरू झाली आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांची बैठक आयोजित करून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत विचार विनिमय करून त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजनही केले. खासगी इंग्रजी शाळांमधील बरेचसे विद्यार्थी फॅन्सी दिसणाऱ्या बॅग वापरतात. त्याचे वजन मोठे असल्याने यावर नियंत्रण आणावे व विद्यार्थ्यांना समान स्वरूपाच्या बॅग उपलब्ध करून दिल्यास ही अडचण दूर होईल, असा विश्वास शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
पाठीवर मोठे दफ्तर, खांद्याला पाण्याची बॉटली, दुसऱ्या खांद्यावर जेवणाचा डबा असलेली बॉस्केट, तर काही ठिकाणी खेळण्याचे सामान दिसून येते. यामुळे मुलांना पाठदुखीचा त्रास होणे, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मान दुखणे, मणक्याची झिज होणे, थकवा, मानसिक ताण अशा व्याधींना सामोरे जावे लागते. या परिस्थितीचा विचार करून सरकारने दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसून येत नव्हती. जिल्हा परिषद शाळांमध्येही अंमलबजावणीचा अभावच आहे. अनेक ठिकाणी मुले हातात पॉलिथीनमध्ये सुटे पुस्तक घेऊन येताना लोकमतच्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले आहे. गडचिरोली शहरात प्लॉटिनम ज्युबली शाळेने दप्तर ओझे कमी करण्यासंदर्भात पालकांना आवाहन करणारे एक पत्र जारी केले होते.
शिक्षण विभागाने अंमलबजावणीवर जेमतेम उपाययोजना सुरू केली आहे. त्याचे स्वरूप व्यापक नसल्याने या उपक्रमाला पालकांचाही फारसा प्रतिसाद अद्याप जिल्ह्यात मिळालेला नाही. त्यामुळे अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दप्तराचे ओझे अद्यापही कायम असल्याचेच दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)
(सहभाग- मुकेश जांभुळकर, प्रशांत ठेपाले, महेंद्र रामटेके)