सुरजागडवरील लोहखनिजाचे काम पूर्ववत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 06:00 AM2019-12-12T06:00:00+5:302019-12-12T06:00:22+5:30
१० डिसेंबर रोजी मंगळवारला धर्मरावबाबा आत्राम यांचे एटापल्ली शहरात आगमन झाले. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली येथे आल्याने त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनावर एटापल्ली शहरासह बांडे, हेडरी, तुमरगुंडा आदी गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिज काढण्याचे काम लॉयड मेटल्स कंपनीमार्फत पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी एटापल्ली तालुक्यातील बेरोजगार नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आ.धर्मरावबाबा आत्राम यांना भेटून निवेदन सादर केले. याप्रसंगी जि.प.बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
१० डिसेंबर रोजी मंगळवारला धर्मरावबाबा आत्राम यांचे एटापल्ली शहरात आगमन झाले. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच एटापल्ली येथे आल्याने त्यांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची भेट घेऊन नागरिकांनी निवेदन दिले. निवेदनावर एटापल्ली शहरासह बांडे, हेडरी, तुमरगुंडा आदी गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटल्यानुसार, सुरजागड पहाडावरील लोहखनिज खननाचे काम मागील एक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे ८०० ते १००० सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार हिरावला आहे.
यापूर्वी कंपनीमार्फत बेरोजगारांना महिन्यातून १० ते १५ दिवस काम मिळत होते. यावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह सुरळीत सुरू होता. काम उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वी बेरोजगारांनी निवेदन दिले, मात्र कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता तरी हे काम पूर्ववत सुरू करून अहेरी विधानसभा क्षेत्रात बेरोजगारीची समस्या कमी करावी, अशी मागणी त्यांनी केली.