रोहयोची कामे तातडीने सुरू करा
By admin | Published: February 10, 2016 01:33 AM2016-02-10T01:33:14+5:302016-02-10T01:33:14+5:30
संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक,
कोरचीत आढावा बैठक : खासदारांचे प्रशासनाला निर्देश
कोरची : संपूर्ण कोरची तालुक्यात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती गंभीर असल्याने येथील गरीब नागरिक, शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आमदार क्रिष्णा गजबे, सत्यनारायण खंडेलवाल, नाना नाकाडे, डॉ. भारत खटी, पं.स. सदस्य चांगदेव फाये, आनंदराव चौबे, डॉ. शैलेंद्रकुमार बिसेन, रवींद्र ओल्लालवार, तहसीलदार विजय बोरूडे, संवर्ग विकास अधिकारी वैरागडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते सामूहिक वनहक्काच्या ३५ दाव्यांचे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांना शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुटपालन, बकरीपालन, मत्स्य व्यवसाय, मधमाशी पालन, गोपालन आदीसह पाले भाज्या पिकविणे तसेच विविध प्रकारच्या फळांचे झाडे लावण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी सूचना खा. नेते यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)