अहेरीत वादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू
By admin | Published: May 20, 2016 01:14 AM2016-05-20T01:14:46+5:302016-05-20T01:14:46+5:30
अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पालकमंत्र्यांकडून नुकसानीची चौकशी : यंत्रणा कामाला लागली
अहेरी : अहेरी, आलापल्ली भागात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठ्यांनी सुरू केले आहे. गुरूवारी अहेरी येथे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तलाठी व सामाजिक कार्यकर्ते दिवसभर करीत होते.
अहेरी तालुक्यातील पेरमिली, आलापल्ली, अहेरी, महागाव, देवलमरी, वेलगुर, बोरी, कमलापूर, उमानूर, गोविंदपूर, जिमलगट्टा, देचली, रामय्यापेठा आदी भागात मोठ्या प्रमाणावर वादळामुळे नुकसान झाले आहे. आलापल्लीत वन नाक्यासमोरील झाड कोसळल्याने नऊ जण जखमी झाले. तर आलापल्ली वन वसाहतीतील ३५ निवासस्थानावरील छत उडाले. १६ विद्युत खांब उन्मळून पडले. या सर्व बाबीचा पंचनामा तलाठ्यांच्या मार्फत सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रशासनाकडून या नुकसानीबाबतची माहिती जाणून घेऊन प्रत्येक नुकसानग्रस्ताला आर्थिक मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्यांनी आदेश दिल्यानंतरच प्रशासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले, अशी माहिती मिळाली आहे. (शहर प्रतिनिधी)