नदीतून लाकडे काढण्याचे काम सुरू
By admin | Published: July 2, 2016 01:31 AM2016-07-02T01:31:56+5:302016-07-02T01:31:56+5:30
आद्रा नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली असून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दूरवरून वाहत आलेली लाकडे काढण्याच्या कामात...
दमदार पावसाचा परिणाम : पोर नदीपात्रावर नागरिकांची गर्दी
आमगाव (म.) : आद्रा नक्षत्राला सोमवारपासून सुरुवात झाली असून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे दूरवरून वाहत आलेली लाकडे काढण्याच्या कामात चामोर्शी तालुक्यातील आमगाव येथील नागरिक भिडले आहेत. सरपणाची व्यवस्था करण्यासाठी आमगाव येथील नागरिक पोर नदीपात्रावर गर्दी करीत आहेत.
आद्रा नक्षत्र सुरू झाल्यापासून चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस बरसत आहे. गुरूवारी दिवसा व रात्रीसुद्धा पावसाने झोडपले. आमगाव (म.) परिसरातही पाऊस झाला. या पावसामुळे नदी किनाऱ्यालगतच्या शेतशिवार व जंगल परिसरातील लाकडे नदी किनाऱ्यावर पुलाजवळ येत आहेत. पोर नदीतील पाण्याची पातळी वाढल्यामुळे लाकडे पाण्याच्या प्रवाहाने आमगाव (म.) नजीकच्या पुलाजवळ अडकत आहेत. सदर लाकडे काढण्याच्या कामात नागरिक लागले आहेत. खोर्दो-विसापूर-आमगाव (म.) मार्गे पोर नदीचा पाण्याचा प्रवाह ओसंडून वाहत आहे. यातून मोठमोठे लाकडे वाहून जात आहेत. सदर लाकडे काढण्यासाठी आमगाव (म.) येथील नागरिक खोर्दो-विसापूर-आमगाव (म.) मार्गावरील पोर नदीच्या पुलावर गर्दी करीत आहेत. (वार्ताहर)
चामोर्शी तालुका जलमय
गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्रंदिवस दमदार पाऊस झाल्याने चामोर्शी तालुका जलमय झाला आहे. या तालुक्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या पाण्याने भरले आहेत. चामोर्शी शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. शेतकऱ्यांनीही पेरणीची कामे आटोपली आहे. दमदार पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग आला आहे.