चिरेपल्ली मार्गाची अवस्था बकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:27 AM2018-11-21T01:27:50+5:302018-11-21T01:28:47+5:30
अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डमेय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डमेय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे.
आलापल्ली-सिरोंचा मार्गावरून गोलाकर्जी गावापासून २० किमी अंतरावर चिरेपल्ली गाव आहे. गावात ५०० ते ६०० लोकसंख्या आहे. सदर मार्ग गोलाकर्जी-रायगट्टा-राजाराम-खांदला-पत्तीगाव-बोगागुडमवरून चिरेपल्लीकडे येतो. येथून परिसरातील नागरिक नेहमीच आवागमन करतात. तालुका मुख्यालयातील विविध कामाकरिता ये-जा करीत असतात. परंतु रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणचा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने येथे मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावर खांदलापासून चिरेपल्लीपर्यंत तीन ते चार नाले आहेत. या नाल्यावर पुलाचे बांधकाम न झाल्याने नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकदा चार ते पाच दिवस मार्ग बंद असतो.
१० वर्षांपूर्वी या मार्गाचे मातीकाम झाले असतानाही अद्यापही खडीकरण का करण्यात आले नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. खडीकरणाअभावी ठिकठिकाणचा रस्ता खचण्याच्या स्थितीत आहे. जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. केवळ निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी रस्त्याच्या खडीकरणाचे आश्वासन देतात. परंतु प्रत्यक्षात काहीच करीत नाही, असा आरोप करीत या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.