कर्जमाफीसाठी राज्य सरकार मुहूर्त शोधतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 02:36 AM2017-04-13T02:36:03+5:302017-04-13T02:36:03+5:30

महाराष्ट्रात मागील अडीच वर्षात कर्जाला कंटाळून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

The state government is looking for debt waiver | कर्जमाफीसाठी राज्य सरकार मुहूर्त शोधतेय

कर्जमाफीसाठी राज्य सरकार मुहूर्त शोधतेय

Next

कुरखेडात कार्यक्रम : जोगेंद्र कवाडे यांचे प्रतिपादन
कुरखेडा : महाराष्ट्रात मागील अडीच वर्षात कर्जाला कंटाळून ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र फडणवीस सरकार कर्जमाफीकरिता मुहूर्ताची वाट पाहात आहे. शासनाने बुलेट ट्रेनकरिता १ लाख कोटी तर मेट्रोकरिता कोट्यवधींचा खर्च करण्याची तयारी चालविली आहे. मात्र शेतकऱ्यांचे ३० हजार ५०० कोटींचे कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडे पैसा नाही, ही शोकांतीका आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य आ. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
कुरखेडा येथे डॉ. आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कृपाशरण महास्थावीर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. जावेद पाशा, प्रा. राजकुमार शेंडे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, सविता बेदरकर, पिरिपा जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर, विजय बन्सोड, विजय शेंडे, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पी. आर. आकरे, नलीनी माने, पत्रूजी ढवळे, मारोती भैसारे, मारोती जांभुळकर, प्रमोद सरदारे, संतोष खोब्रागडे, दयाराम खोब्रागडे, बालक भानारकर, भीमाबाई सरदारे, मुकेश खोब्रागडे, संघमित्रा ढवळे आदी उपस्थित होते. यावेळी आ. कवाडे यांनी या देशाची राज्यघटना निर्माण झाल्यापासून ती बदलविण्याचे कटकारस्थान काही प्रवृत्ती करीत आहे. त्यांनी खुशाल घटना बदलवावी, आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचे समतेचे राज्य आणू असे यावेळी सांगितले.
प्रा. जावेद पाशा यांनी शाहू, फुले, आंबेडकर चळवळीचा लढा हा समता परिवर्तनाचा नसून व्यवस्था परिवर्तनाचा आहे. सत्तेत परिवर्तन आले मात्र व्यवस्था तीच आहे. समता, बंधुत्व व न्याय असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्याकरिता सामाजिक परिवर्तनाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक अ‍ॅड. छन्ना जनबंधू, संचालन घनश्याम सरदारे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The state government is looking for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.