जिल्हा बँकेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:33 AM2017-12-21T00:33:36+5:302017-12-21T00:34:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे महाराष्ट्रातील ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रेणीमध्ये सन २०१६-१७ या वर्षाचा कै. व्यंकूठभाई मेहता उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सदर पुरस्काराचे वितरण जानेवारी २०१८ मुंबई येथे होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सलग पाचव्या वर्षी उत्कृष्ट जिल्हा बँकेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी सदर बँकेला सन २०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५, २०१५-१६ मध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
जिल्हा बँकेच्या गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५५ शाखा असून या शाखांच्या माध्यमातून चार लाख ग्राहकांना बँकिंग सेवा दिली जात आहे. सदर बँकेकडे सद्य:स्थितीत १ हजार २५० कोटींच्या ठेवी असून या बँकेमार्फत ७४० कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व शाखा सीबीएस प्रणालीने मुख्य कार्यालयाशी जोडलेल्या आहेत. या बँकेचे जिल्ह्यात एकूण २८ एटीएम कार्यान्वित आहेत. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल कर्मचाºयांचे कौतुक केले आहे.