बापूंच्या विचारांनी प्रेरित होऊन ५० वर्षांपूर्वी उभारला पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:14 AM2018-10-05T00:14:14+5:302018-10-05T00:15:20+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली.
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आरमोरी तालुक्यातील कुलकुली येथील गावकऱ्यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींच्या पुतळ्याची गावात उभारणी केली. हा पुतळा अजूनही गावकऱ्यांना अहिंसेच्या विचारांची प्रेरणा देत आहे.
माझ्या देशबांधवांना अंगभर कपडे मिळत नाही. मग मी अंगभर कपडे कसे नेसू, असे विचार बाळगून स्वत: संपूर्ण जीवनभर पंचा घातला. देशवासीयांना मीठ मिळत नाही, त्यामुळे मी ते कसे खाऊ, असे म्हणून जेवनात मिठाचा त्याग केला. अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाºया या अहिंसेच्या पुजाºयाच्या नावाचा राज्यकर्त्यांनी सोयीनुसार वापर केला. मात्र या युग प्रवर्तकाचे विचार भावीपिढीला अहिंसेची प्रेरणा देत राहावे, याउद्देशाने आरमोरी तालुक्यातील कुलकुली या गावात सुमारे ५० वर्षांपूर्वी कोवे गुरूजींच्या पुढाकाराने महात्मा गांधींचा पुतळा उभारला गेला. गांधीजींच्या कर्तृत्व व विचाराने भारावलेल्या कुलकुलीवासीयांनी स्वत:कडे पैसे गोळा केले. ज्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी श्रमदान करण्याची तयारी दर्शविली. सर्व गावकºयांच्या सहकार्यातून महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. कुलकुली हे गाव आदिवासीबहुल आहे.
५० वर्षांपूर्वी महात्मा गांधींचे विचार दुर्गम व आदिवासीबहुल गावांपर्यंत पोहोचले. यावरून महात्मा गांधींजींचे विचार किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना येण्यास मदत होते.
दरवर्षी २ आॅक्टोबरला या गावात कार्यक्रम आयोजित केला जातो. अहिंसेच्या या पुजाºयाला संपूर्ण गाव नतमस्तक होते. गांधींजींच्या एका हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत या गावातील नागरिकांनी चिमुर स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेणारे देशभक्त आज हयात नसले तरी राष्टÑपिता महात्मा गांधींजींचा पुतळा त्यांच्या कार्याची आठवण करून देत आहे.
अंगारा-मालेवाडा मार्गावर रस्त्यालगत असलेला गांधीजींचा पुतळा ये-जा करणाºयांचे लक्ष वेधून घेत असून अहिंसेच्या मार्गाने चालण्याचा संदेश देत आहे. इतिहासाची साक्ष देणाºया या पुतळ्याकडे मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या जागेचा वापर आपले वाहन ठेवण्यासाठी केला आहे. त्यामुळे पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने या पुतळ्याची देखभाल व दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कुलकुली गावातील महात्मा गांधीजींचा पुतळा इतिहासाची साक्ष देणारा आहे. त्यामुळे या पुतळ्याचे विशेष महत्त्व आहे. पुतळ्याच्या सभोवताल वाहने ठेवली जात असल्याची बाब ग्रामपंचायत पदाधिकारी व काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आली आहे. या ठिकाणचे अतिक्रमण हटवून सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले जाईल, तसा ठराव गावकºयांनी घेतला आहे.
- नीलेश जौंजाळकर, ग्रामसेवक, कुलकुली