कायदे व हक्कांविषयी जागृत राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:17 AM2017-09-12T00:17:07+5:302017-09-12T00:17:22+5:30
सद्याच्या आधुनिक युगात प्रत्येक नागरिकाला कायदेविषयक परिपूण माहिती असणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : सद्याच्या आधुनिक युगात प्रत्येक नागरिकाला कायदेविषयक परिपूण माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय आपल्या अधिकार व हक्काची जाणीव असावी, विधी सहाय्य चिकित्सालयाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी. मेहरे यांनी केले.
तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय धानोरा आणि ग्रामपंचायत लेखा (मेंढा) याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी धानोरा येथे विधी सहाय्य चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कायदेविषयक शिबिरही घेण्यात आले. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव तथा मुख्य न्याय दंडाधिकारी बी.एम. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष लि.दा. कोरडे, समाजसेवक देवाजी तोफा, अधिवक्ता टी.के. गुंडावार, विधी सेवा स्वयंसेवक सुनीता झंझाळ, घनश्याम राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी न्यायाधीश मेहरे यांनी विधी सहाय्य चिकित्सालयाची कार्यपद्धती व महत्त्व अनेक उदाहरण देऊन पटवून दिले. तसेच चिकित्सालयात नेमण्यात आलेल्या अधिवक्ता व विधी सेवा स्वयंसेवकाच्या मदतीने गरजू लोकांनी या चिकित्सालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मुख्य न्यायदंडाधिकारी पाटील यांनी चिकित्सालयाबाबत माहिती दिली. तसेच न्या. कोरडे यांनी अंमली पदार्थामुळे पीडित व्यक्तींना विधीसेवा व अंमली पदार्थाचे निर्मूलन, योजना २०१५ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाचे ग्रामसेवक कुनघाडकर, संचालन म्हशाखेत्री यांनी केले तर आभार झंझाळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व गावातील इतर पदाधिकाºयांनीही सहकार्य केले. यावेळी लेखा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.