एसटीचे वायफाय ठरले मृगजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:01 AM2017-11-15T00:01:50+5:302017-11-15T00:02:02+5:30
गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय लावण्यात आले आहे. मात्र सदर वायफाय बºयाचवेळा सुरू होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याने वायफाय केवळ देखावा असल्याचा....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय लावण्यात आले आहे. मात्र सदर वायफाय बºयाचवेळा सुरू होत नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत असल्याने वायफाय केवळ देखावा असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
प्रवाशी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक बदल केले आहेत. एसटीमध्ये प्रवास करताना प्रवाशांना करमणुकीचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यभरातील सर्वच बसेसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गडचिरोली आगारातील एकूण ११० बसेसपैकी ६० बसेसला दोन महिन्यांपूर्वी वायफाय बसविण्यात आले आहे. वायफायची सुविधा म्हटल्यानंतर आपला मोबाईल इंटरनेटशी कनेक्ट होईल, असा प्रवाशांचा अंदाज होता. मात्र सदर वायफायचा इंटनेट कनेक्टीव्हीटीसोबत काहीच संबंध नाही.
मोबाईलचा वायफाय सुरू केल्यानंतर ‘वुड डॉट कॉम’ या साईटवरून काही निवडक हिंदी व मराठी चिपत्रट, कॉमेडी दिसतात. बºयाच बसेसमधील वायफाय उघडत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. ज्या एसटीमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध आहे. अशा एसटीमध्ये सूचनाफलक लावला असून वायफाय कसा उघडण्यात यावा याबाबत सूचना दिल्या आहेत. सूचनांचे पालन करून वायफाय उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर बºयाचवेळा वायफाय उघडत नाही. त्यामुळे प्रवाशांची निराशा होते. काही प्रवासी वाहकाला वायफाय कसे उघडावे, याबाबत विचारणा करतात. मात्र काही वाहकांना याबाबतचे ज्ञान नसल्याचे दिसून येते. आपल्याला वायफायबाबत काहीच माहित नसल्याचे उत्तर वाहकांकडून दिले जात आहे. तांत्रिक अज्ञानामुळे सुविधा उपलब्ध असूनही प्रवाशांना मनोरंजनापासून वंचित राहावे लागत आहे. दरदिवशी तेच ते मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू होत असल्याने दरदिवशी प्रवास करणाºया प्रवाशांसाठी सदर कार्यक्रम कंटाळवाणे ठरत आहेत. त्यामुळे काही कालावधीनंतर वायफायमधील कार्यक्रमांमध्ये बदल करावा. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची संख्या वाढवावी, जेणेकरून पर्यायी कार्यक्रमांची संख्या वाढण्यास मदत होईल, अशी मागणी आहे.
इंटरनेट सुविधेची मागणी
वायफाय म्हटल्यावर आपला मोबाईल इंटरनेशी कनेक्ट होईल, असा सर्वसाधारण समज प्रवाशांचा होतो. मात्र सदर वायफाय इंटरनेशी कनेक्ट होत नाही. तर एसटीच्या वायफायमध्ये जेवढे मनोरंजनात्मक कार्यक्रम टाकलेले आहेत तेवढेच बघता येतात. त्यामुळे प्रवाशांची निराशा होते. वायफायच्या माध्यमातून मोबाईल इंटरनेटशी जोडण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पहिल्या टप्प्यात गडचिरोली आगारातील ६० बसेसमध्ये वायफाय बसविण्यात आले आहे. अपवाद वगळता सर्वच बसेसमधील वायफाय उघडतात. काही कालावधीनंतर वायफायमधील मनोरंजनात्मक कार्यक्रम बदलविले जातात. वायफायच्या माध्यमातून मनोरंजनाची सुविधा झाल्याने लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे.
- विनेश बावणे,
एसटी आगार प्रमुख, गडचिरोली