स्वच्छतागृहांअभावी पसरली दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:37 AM2021-01-19T04:37:27+5:302021-01-19T04:37:27+5:30
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव ...
तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले
सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व बोड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांचे दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.
पोर्ला येथील विश्रामगृहाची दुरवस्था
पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले, परंतु या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.
सावरगाव परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष
धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.
वाकडी-बोरी मार्गावर खड्डे कायम
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून, या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरूस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताची मोहीम थंडावली
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
देसाईगंजात गंजलेले, जीर्ण खांब बदलवा
देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. सदर खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कठड्यांअभावी अपघाताची शक्यता
चामोर्शी : गडचिरोली मार्गावरील पोहर नदीत चिचडोह बॅरेजचे पाणी साचले आहे. या नदीवरील पूल अरुंद आहे, तसेच या पुलावर लोखंडी कठडे उभारण्यात आले नाही. त्यामुळे एखादे वाहन कोसळून धोका होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वर्दळ पाहता पोहर नदीवर कठडे लावावे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : गडचिराेलीपासून १२ किमी अंतरावर असलेल्या मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केली.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : शहराच्या कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने, परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.