शेती सबलीकरणाकडे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 01:44 AM2018-09-05T01:44:06+5:302018-09-05T01:45:04+5:30
अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : अनुगामीन लोकराज्य महाअभियान संस्था व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून एटापल्ली तालुक्याच्या तोडसा येथील मामा तलाव ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ या योजनेत समाविष्ट करण्यात आला. तलावातील गाळ काढून शेतात टाकण्यात आला. त्यामुळे सदर तलावातील पाणीसाठा वाढला. सदर योजनेतून जलसमृद्धीसोबतच शेती सबलीकरणाकडे पाऊल पडत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
तोडसा येथील मामा तलावाचे जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी सचिन पानसरे, नायब तहसीलदार बुरांडे, तोडसाचे सरपंच प्रशांत आत्राम, संस्थेचे उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, जि. प. सभापती माधुरी उरेते, शाखा अभियंता मुके, अनुलोमचे जनसेवक पंकज नैनुरवार, वस्तीमित्र राहूल पालकृतीवार, नवीन बाला, जनार्धन नळलावार, सचिन मोतकुरवार, मुकेश नामेवार, रवी नेलकुद्री आदी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री आत्राम यांनी तलावातून निर्माण झालेल्या सिंचन सुविधेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दुबार पीक घ्यावे, असे आवाहन केले. गाळयुक्त शिवार योजनेतून तोडसाच्या मामा तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे या तलावात जलसाठा वाढला असून हातपंप व विहिरीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी सुविधा निर्माण झाली आहे, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले. सरपंच प्रशांत आत्राम व शेतकरी कुंदन दुर्गे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.