चोरीच्या रेतीने एटापल्ली तालुक्यात बांधकामे जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:57 PM2019-05-18T23:57:35+5:302019-05-18T23:57:53+5:30
संपूर्ण एटापल्ली तालुक्यात एकही रेतीघाटाचा अधिकृतरित्या लिलाव झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या जी बांधकामे सुरू आहेत, ती बांधकामे चोरीच्या रेतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : संपूर्ण एटापल्ली तालुक्यात एकही रेतीघाटाचा अधिकृतरित्या लिलाव झालेला नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सध्या जी बांधकामे सुरू आहेत, ती बांधकामे चोरीच्या रेतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.
एटापल्ली तालुक्यात १९२ गावे आहेत. या तालुक्यातून बांडे ही मुख्य नदी वाहते. तसेच लहान-मोठ्या अनेक नद्या व नाले आहेत. या सर्वच नदी, नाल्यांमध्ये उत्कृष्ट दर्जाची रेती आहे. मात्र हा सर्व क्षेत्र जंगलाने व्यापला असल्याने सदर क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारित येते. परिणामी या नदी, नाल्यांमधील रेतीचा लिलाव होत नाही. सर्वात मोठी नदी असलेल्या बांडे नदीचा सुद्धा मागील पाच वर्षांपासून लिलाव झाला नाही. परिणामी रेती तस्करीचे प्रमाण वाढले आहे. आलदंडी गावाजवळून रेतीची खुलेआम तस्करी केली जात आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. एटापल्ली तालुक्यात सुरू असलेली शासकीय कामे सुद्धा चोरीच्या रेतीने सुरू आहेत. कंत्राटदार नेमक्या कुठल्या टीपी बिलाला जोडतात, हे एक न उलगडणारे कोडे बनले आहे.