कुरूडच्या होळी चौकात अज्ञात इसमाद्वारे नागरिकांवर हाेताहेत दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:45 AM2021-09-16T04:45:18+5:302021-09-16T04:45:18+5:30
गावामध्ये भीतीचे वातावरण कुरूड : देसाईगंज तालुक्यातील ४ किमी अंतरावरील कुरूड येथील होळी चौकात व आजूबाजूच्या परिसरात ...
गावामध्ये भीतीचे वातावरण
कुरूड : देसाईगंज तालुक्यातील ४ किमी अंतरावरील कुरूड येथील होळी चौकात व आजूबाजूच्या परिसरात अज्ञात इसमाद्वारे नागरिकांवर दगडफेक केली जात असल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. नेमकी दगडफेक कोण करीत आहे, हे अजूनही कळलेले नसल्याने परिसरातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे.
होळी चौकात नागरिकांना विचारणा केली असता, १३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास व सकाळी मोठमोठी दगडं, विटा फेकून मारली जात असून रामा ढोरे, विनोद सहारे यांच्या मुलीला दगड लागल्याने नेमकी दगडफेक कुणी केली, याबाबत परिसरातील लोक अनभिज्ञ आहेत. रात्रीच्या घटनेची माहिती शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य अविनाश गेडाम यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून शहानिशा केली असता, दगडफेक झाली असल्याचे कळले आहे. १४ सप्टेंबर रोजी पुन्हा सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विटा, दगडफेक झाल्याची माहिती होळी चौकातील नागरिकांनी दिली.
दगडफेक करणारा कुणी ‘भूत - पिशाच्च’ नसून एखाद्या माथेफिरू अज्ञात इसमाद्वारे असे कृत्य जाणूनबुजून केले जात असावे, असा अंदाज व्यक्त केला. याबाबतचा तपास पोलीस विभागाकडून सुरू आहे. देसाईगंज येथील पोलीस निरीक्षक महेश मेश्राम यांना घटनेबाबत विचारणा केली असता, दिवस व रात्रीला बंदोबस्त लावण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली.
150921\1337-img-20210915-wa0007.jpg
हेच ते दगड