देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:55 AM2021-02-05T08:55:01+5:302021-02-05T08:55:01+5:30
आरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव हे मोठे गाव आहे. देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय ...
आरमोरी : आरमोरी-गडचिरोली मार्गावरील देऊळगाव हे मोठे गाव आहे. देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.
मुख्य बाजारपेठेत चारचाकी वाहन बंदीकडे दुर्लक्ष
गडचिरोली : शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे. परिसरातील त्रिमूर्ती चौकात बाजारपेठ असल्याने येथे चारचाकी व दुचाकी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. या परिसरातून एकतर्फी वाहतूक केल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री
आष्टी : चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लीटरमागे २० ते ३० रूपये जादा उकळतात.
चामोर्शी मार्गावर प्रवासी निवारा द्या
गडचिरोली : चामोर्शी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी प्रवासी निवारा नसल्याने प्रवासी भर उन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बसथांब्यावरून अनेक प्रवासी चामोर्शी, अहेरीकडे ये-जा करतात. त्यामुळे गडचिरोली आगाराने चामोर्शी मार्गावर प्रवाशांसाठी शेड उभारावी, अशी मागणी होत आहे. निवाऱ्याअभावी येथे प्रवाशांना उभे राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे येथे बस थांबा द्यावा.
भिकारमाैशी मार्गाची दुरवस्था कायम
गडचिरोली : तालुक्यातील उसेगाव ते भिकारमाैशी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून आवागमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावरून महामंडळाच्या अनेक बसफेऱ्या आहेत. शालेय विद्यार्थी व नागरिक येथून आवागमन करीत असतात.
कुरखेडातील नळ जोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचल्या जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी
आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.
अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता
एटापल्ली : अहेरी उपविभागातील मार्गावर लावण्यात आलेले अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक बेपत्ता झाले आहे. यामुळे रात्री अनोळखी नागरिक तसेच वाहनचालक रस्ता विसरून भलतीकडेच वळतात. संबंधित यंत्रणेने अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावावे, अशी मागणी होत आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
तपासणी नाक्यावर कर्मचाऱ्यांचा अभाव
गडचिरोली : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी पार पाडावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. परिणामी तपासणी योग्य होत नसल्याने महसूल बुडत आहे. मात्र याकडे कानाडोळा होत आहे.