रास्ता रोको आंदोलन
By admin | Published: July 2, 2016 02:00 AM2016-07-02T02:00:40+5:302016-07-02T02:00:40+5:30
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे...
गोंदिया : मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन पाडल्याच्या विरोधात बुधवार (दि.२९) आंबेडकरी समाजाद्वारे शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील मुख्य रस्ता जवळपास अर्ध्या तासापर्यंत थांबवून ठेवण्यात आला. भवन पाडण्यात मुख्य आरोपी रत्नाकर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांना अविलंब अटक करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होती. आंदोलनकर्त्यांमध्ये प्रामुख्याने समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा व भारिप बहुजन महासंघ या संघटनांच्या जिल्हाभरातील हजारो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
सदर रास्ता रोको आंदोलनात भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, समता सैनिक दलाचे कमांडींग आॅफिसर जितेंद्र मेश्राम व भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवाराम मेश्राम यांनी सांगितले की, एकीकडे शासन लंडन स्थित बाबासाहेबांचे घर चाळीस कोटीमध्ये व मुंबई येथील इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी खरेदी करण्याच्या गोष्टी सांगतात. तर दुसरीकडे आंबेडकरी व बहुजन समाजाच्या राजकीय, सामाजिक व संघटनात्मकरित्या जुडलेल्या भवनास असामाजिक तत्वांद्वारे मध्यरात्री तोडल्यावरही आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नाही.
सन १९४४ मध्ये बाबासाहेबांनी मुंबईच्या दादर परिसरात सदर जमीन खरेदी करून आंबेडकर भवनाचे बांधकाम केले होते. याच भवनात बुद्धभूषण प्रिंटींग प्रेसची स्थापना करून मुकनायक व बहिस्कृत भारत वर्तमानपत्रे चालवित होते.
एवढेच नव्हे तर आंबेडकरी-बहुजन समाजाचे उद्धार करणारे कार्य याच भवनात बाबासाहेब आंबेडकर यांनी चालविले होते. संपूर्ण आंबेडकरी बहुजन समाजाच्या या भवनातून राजकीय, सामाजिक व संघटनात्मक नाता जुडलेला आहे. त्यामुळे भवन पाडणाऱ्यांना अविलंब अटक करण्याची मागणी सदर रास्ता रोको आंदोलनात करण्यात आली आहे. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)