झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:58 PM2019-02-22T23:58:35+5:302019-02-22T23:59:11+5:30
कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : कोरची तालुक्याच्या बेडगाववासीयांनी आपल्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूवारी सकाळी ९ वाजतापासून कुरखेडा-कोरची मार्गावरील झनकारगोंदी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे कुरखेडा-कोरची मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. परिणामी या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
बेडगाव ग्रामपंचायतीमध्ये स्थायी ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी, बेडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, बेडगाव येथील वनविभागाचे कार्यालय व निवासस्थानाच्या जीर्ण इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात यावे, जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, आदी मागण्यांसाठी बेडगाववासीयांनी रास्तारोको आंदोलन केले. विशेष म्हणजे बेडगाववासीयांच्या वतीने या मागण्यांसंदर्भात तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाºयांकडे अनेकदा निवेदन देण्यात आले होते. मात्र निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. मागण्या निकाली काढण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बेडगाववासीयांनी अखेर गुरूवारी झनकारगोंदी फाट्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत कोरचीचे नायब तहसीलदार नारनवरे, बेडगाव पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक ढेकणे, पंचायत विस्तार अधिकारी फाये, राजस्व निरीक्षक पेंदाम यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. येथे आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. वरिष्ठ अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांनी मागण्या निकाली काढण्याबाबतचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. दरम्यान तब्बल पाच तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर रास्तारोको आंदोलनादरम्यान कुरखेडा-कोरची या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली. आंतरराज्यीय वाहतूक करणाºया ट्रकांची दोन्ही बाजूला लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. याशिवाय प्रवाशी वाहनेही थांबली होती.