पाणी टाकीचे काम बंद
By admin | Published: October 12, 2015 01:52 AM2015-10-12T01:52:28+5:302015-10-12T01:52:28+5:30
आष्टी गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्राम पंचायत प्रशासनाने येथे पाण्याची टाकी व वाढीव पाईपलाईनचे काम मंजूर केले. सदर काम ३० टक्के झाले आहे.
आष्टी : आष्टी गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ग्राम पंचायत प्रशासनाने येथे पाण्याची टाकी व वाढीव पाईपलाईनचे काम मंजूर केले. सदर काम ३० टक्के झाले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप आष्टी ग्राम पंचायतीच्या काही सदस्यांनी मासिक सभेत केला. त्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने या कामाच्या कंत्राटदाराचे दुसरे बिल रोखून धरले. तेव्हापासून आष्टीच्या वाढीव पाणीपुरवठा टाकीचे काम बंद पडले आहे. परिणामी आष्टी गावातील पाणी समस्या कायम आहे.
पूर्वी आष्टी गावाची लोकसंख्या ४ हजार ७०० होती. लोकसंख्येत वाढ होऊन सध्या आष्टी गावाची लोकसंख्या ६ हजारवर पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे गेल्या दोन वर्षांपासून आष्टी गावात अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या निर्माण झाली. पंचायत समिती व जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ग्राम पंचायतीने आष्टी येथे नव्याने पाण्याची टाकी व वाढीव नळ पाईपलाईनचे काम २ मे २०१५ रोजी मंजूर केले. त्यानंतर या कामासाठी १ कोटी ८९ लाख रूपये मंजूर झाले. सुरुवातीला ५८ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर एका खासगी कंत्राटदाराकडून सदर पाणीटाकीचे काम सुरू करण्यात आले. ३० टक्के काम झाल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला ५८ लाख रूपयांचे पहिले बिल अदा केले. त्यानंतरही कंत्राटदाराने पाणीटाकीचे काम सुरू केले. ४० टक्के काम झाल्यानंतर कंत्राटदाराचे ५४ लाख ७८ हजार रूपयांचे दुसरे बिल तयार झाले. दरम्यान ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी सुरू असलेल्या पाणी टाकीच्या कामावर आक्षेप घेतला. संबंधित खासगी कंत्राटदाराकडून या कामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असून सदर कामाचा दर्जा ढासळला आहे, असा आरोपही त्यांनी ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत केला. ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांनी संबंधित कंत्राटदाराचे दुसरे बिल रोखून धरण्याचे एकमताने ठरविले. तेव्हापासून सदर पाणीटाकीचे काम रखडले आहे. (प्रतिनिधी)