गोलाकर्जीत राकाँचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:53 PM2017-12-18T23:53:08+5:302017-12-18T23:53:35+5:30
आदिवासी व गैरआदिवासींच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी अहेरी तालुक्याच्या गोलाकर्जी वळणावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
कमलापूर : आदिवासी व गैरआदिवासींच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात सोमवारी अहेरी तालुक्याच्या गोलाकर्जी वळणावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान राकाँचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांनी येथे तब्बल अडीच तास वाहतूक रोखून धरली.
आदिवासींच्या वन जमिनीवर शासन रोपवन तयार करण्याचा आदेश देत आहे. तसेच गरीब वृध्दांच्या अनुदानात वाढ करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सर्वसामान्य व गरीब नागरिकांच्या हक्कासाठी या सरकारच्या काळात आम्हाला व जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, असेही धर्मरावबाबा यावेळी म्हणाले.
गोलाकर्जी येथील वळणावर वाजत-गाजत येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ८ ते १०.३० वाजतापर्यंत हे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात जि.प.च्या बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, पं.स. सदस्य हर्षबाबा आत्राम, रवींद्रबाबा आत्राम, जि.प.चे माजी अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, जहीरउद्दीन हकीम, राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, मातय्या आत्राम, कैलाश कोरेत, स्नेहदीप आत्राम यांच्यासह कमलापूर, ताटीगुडम, छल्लेवाडा, कोडसेलगुड्डम, गुड्डीगुडम, राजाराम खांदला, रेपनपल्ली व जिमलगट्टा आदी भागातील ५०० वर नागरिक सहभागी झाले होते.
सदर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून निवेदन स्वीकारण्यासाठी अहेरीचे उपविभागीय अधिकारी सचिन ओंबासे व तहसीलदार प्रशांत घोरूडे, नायब तहसीलदार चंद्रकांत तेलंग हे गोलाकर्जी वळणावर आले होते.
निवेदनातील मागण्या
आदिवासी, गैरआदिवासी, जबरानजोतधारक कास्तकारांना वनहक्क कायद्यांतर्गत पट्टे देण्यात यावे, संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अनुदान ६०० रूपयांवरून दीड हजार करण्यात यावे, एपीएल व बीपीएलधारकांना तीन रूपये किलो दराने तांदूळ देण्यात यावा, तेंदूबोनसची रक्कम हडप करणाºया नेत्यांची चौकशी करण्यात यावी, दोन लाखांच्या अनुदानाचे घरकूल देण्यात यावे.