वादळाने विद्युत खांब कोसळले
By admin | Published: May 30, 2017 12:43 AM2017-05-30T00:43:37+5:302017-05-30T00:43:37+5:30
२८ मे रोजी रविवारला रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे कुनघाडा रै. येथील ...
दुरूस्ती करा : कुनघाडा रै. येथील वीज पुरवठा खंडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव : २८ मे रोजी रविवारला रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळामुळे कुनघाडा रै. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील गिलगाव व माल्लेरमाल मार्गावरील वळण रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत खांब कोसळले. त्यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडल्या. परिणामी या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे.
कुनघाडा रै. परिसरात मागील १० दिवसांपासून दररोज चक्रीवादळाचा तडाखा बसत आहे. तसेच परिसरात आगीच्याही घटनांमध्ये वाढ झाली आहे. वादळामुळे या भागात हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे वीज पुरवठा दररोज खंडीत होत असल्यामुळे अनेक जणांची घरगुती विद्युत उपकरणे जळाली आहेत. तळोधी मो. येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे काम पूर्ण होऊनही ते कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे सदर उपकेंद्र शोभेची वास्तू बनली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतानाही ३३ के व्ही उपकेंद्र बंद असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. त्यामुळे महावितरणने वादळाने कोसळलेला वीज खांब तत्काळ बदलवावा, या ठिकाणी नवीन खांब उभारून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.