वादळाने आंबे झडले; हजारोंचे नुकसान
By Admin | Published: May 17, 2017 01:22 AM2017-05-17T01:22:51+5:302017-05-17T01:22:51+5:30
गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तांबासी येथील प्रगतीशिल शेतकरी उद्यानपंडीत गणपती सातपुते
आमराईत आंब्यांचा सडा : नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तांबासी येथील प्रगतीशिल शेतकरी उद्यानपंडीत गणपती सातपुते यांच्या आमराईतील आंबा पिकाची दाणादाण झाली आहे. यामध्ये सातपुते यांचे जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. चामोर्शी, घोट तसेच जिल्ह्याच्या काही भागात वादळ आल्याने मोठ्या प्रमाणात आंबे झडले. हातात आलेले आंब्याचे पीक ऐनवेळी वादळाने गेल्यामुळे आंबेमालक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आहेत.
चामोर्शी तालुक्यातील तांबासी गावापासून एक किमी अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावर गणपती सातपुते यांचे शेतशिवार आहे. शेतजमीनीमधून धान उत्पादनासह भाजीपाला तसेच आंबा पिकांचे सातपुते उत्पादन घेतात. त्यांच्या शेतात २०० ते २५० आंब्यांची झाडे आहेत. आंबा वाडीमध्ये दशरी, कलमी, केशर, रत्ना, तोतापूरी, बेंगनपल्ली, निलम, शेंदरी, गावरान आदी प्रजातींच्या आंब्यांची झाडे आहेत. दरवर्षी ते आंबा विक्रीतून २ लाख रूपयांचे उत्पादन घेतात. दररोज त्यांच्या आंबा वाडीवर १० ते १५ मजूर काम करीत असतात. यावर्षी आंबा उत्पादन उत्तम व मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जवळपास ३ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र नुकत्याच आलेल्या वादळामुळे आंबे गळाले असून जवळपास ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती सातपुते यांनी दिली आहे. कृषी विभागाने दखल घेवून मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी आहे.
सर्वेक्षण व मदत करा
गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात वादळी पाऊस होत आहे. यामुळे आंब्यासह उन्हाळी धानपीक तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणच्या शेतातील टमाटर झडून फुटून गेले. या नुकसानीसंदर्भात महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी होत आहे.