दक्षिण भागाला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:18 PM2019-04-19T22:18:42+5:302019-04-19T22:19:12+5:30
चामोर्शी, मुलचेरा, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री वादळाने कहर माजविला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर काही मार्गावर झाडे कोसळल्याने रात्रभर वाहतूक ठप्प होती. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी, मुलचेरा, अहेरी या तीन तालुक्यांमध्ये गुरूवारी रात्री वादळाने कहर माजविला. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. तर काही मार्गावर झाडे कोसळल्याने रात्रभर वाहतूक ठप्प होती. वादळाने वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.
मुलचेरा तालुक्यातील लगाम परिसरातील लगाम, लगाम चेक, काकरगट्टा, गिताली आदी गावांना वादळाचा तडाखा बसला. आष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या लगाम येथील मुख्य मार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णत: बंद झाली होती. लहान वाहने व बसेस गावातील अंतर्गत मार्गाने काढल्या जात होत्या. मात्र जड वाहने गावातून नेणे शक्य नसल्याने या वाहनांची धुन्नूर फाट्यापर्यंत पाच किमीपर्यंतची रांग लागली होती. वादळी पावसाच्या तडाख्याने झाडे वीज तारांवर कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. विजेच्या तारा लोंबकळत होत्या. लगाम येथील कवडू श्रीकोंडावार यांच्या घरावरील टिन व कवेलु उडून गेल्याने त्यांच्या घराचे नुकसान झाले. ते झोपेत असताना कवेलु पडल्याने किरकोळ नुकसान झाले. दिलीप कोसरे यांच्या शौचालयाच्या भिंतीवर झाड कोसळल्याने भिंत कोसळली.
देशबंधूग्राममधील जवळपास २५ ते ३० घरांचे छप्पर उडून गेले. वादळामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. प्रफुल्ल बाच्छाड, रंजित बाच्छाड, सुभाष सरकार, सुमारेश सरकार, निमाई पांडे यांच्यासह घरांची पडझड झाली. वीज तारा तुटल्याने या गावाचा वीज पुरवठा खंडीत झाला. देशबंधूग्राम गावातील रस्त्याच्या बाजुला एक म्हैस व गाय मृतावस्थेत आढळली. त्यांच्यावर वीज पडल्याची शंका उपस्थित केली जात आहे.
राजाराम परिसरात गुरूवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास वादळ आले. राजाराम परिसरातील खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, रायगट्टा, गोलाकर्जी आदी गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. गोलाकर्जी येथील बुच्चा गंगराम आत्राम यांच्या बैलावर वीज पडल्याने बैल ठार झाला. पं.स. सदस्यांनी गोलाकर्जी येथे जाऊन पाहणी केली. तलाठी ई. एस. चांदेकर यांना घटनेची माहिती देण्यात आली. बैल मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ठार झालेल्या बैलाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी पं.स. सदस्य भास्कर तलांडे, तलाठी ई. एस. चांदेकर, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर आत्राम, कोतवाल महादेव आत्राम, राकेश कंबगोणीवार, बिच्चु मडावी, भिमा सडमेक, मुसली सडमेक, शंकर सिडाम, सिताराम सिडाम, अशोक आत्राम, इंदरशहा सडमेक आदी उपस्थित होते.
आष्टी येथील आलापल्ली मार्गावरील ग्रामीण रूग्णालयाजवळ असलेले झाड विद्युत तारांवर कोसळले. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. सुमारे पाच तास वीज पुरवठा खंडीत होता. शुक्रवारी सकाळपर्यंत पडलेले झाड रस्त्यावरच होते. त्यामुळे रस्त्याच्या बाजुने वाहने न्यावी लागत होती.
अहेरी तालुक्यातील आलापल्ली, अहेरी, नागेपल्ली, खमनचेरू परिसराला वादळी वाºयाची व पावसाची झळ सोसावी लागली. आलापल्ली वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला.
भामरागडमध्येही वादळी पाऊस झाला. गुरूवारी रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता. शुक्रवारी सकाळी वीज आली. मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत विजेचा लपंडाव सुरूच होता. त्यामुळे नागरिक कमालीचे कंटाळले आहेत.
आष्टी-आलापल्ली महामार्गावरील १३ तास वाहतूक ठप्प
आष्टी-आलापल्ली मार्गावरील लगाम गावाजवळ रस्त्यावरच झाड कोसळले. लहान वाहने गावातील अंतर्गत मार्गाने नेऊन अडथळा पार केला जात असला तरी जड वाहने मात्र गावातून नेणे शक्य नसल्याने झाड तोडण्याची प्रतिक्षा करावी लागली. रात्री ११ वाजताच्या सुमारास झाड कोसळले. गावातील वीज पुरवठाही खंडीत झाला. त्यामुळे रात्रीच्या सुमारास झाड तोडणे शक्य नव्हते. सकाळी गावकऱ्यांनी झाड तोडून रस्ता मोकळा केला. तोपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती. लगामचे सरपंच मनिष मारटकर, चुटुगुंटाचे सरपंच सुधाकर नैताम यांनी आपल्या परिसरातील नागरिकांना घेऊन रस्त्यावरचे झाड मोकळे केले. अहेरीचे पोलीस निरिक्षक सतिश होडगर, वन परिक्षेत्राधिकारी मनोज चव्हाण, ट्राफीक पोलीस बेगलाजी दुर्गे यांनी पहाटेपासून रहदारी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. लगाम येथील छोटू श्रीकोंडावार, दीपक आत्राम यांच्या घरावर झाड कोसळल्याने घराचे नुकसान झाले.