मोहलीला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:30 PM2019-05-03T23:30:11+5:302019-05-03T23:30:38+5:30
धानोरा तालुक्यातील मोहली गावाला २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. वादळानंतर पावसाला सुरूवात झाली. वादळाने अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. रांगीपासून सात किमी अंतरावर धानोरा मार्गावर मोहली गाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : धानोरा तालुक्यातील मोहली गावाला २ मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाचा तडाखा बसला. वादळानंतर पावसाला सुरूवात झाली. वादळाने अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले.
रांगीपासून सात किमी अंतरावर धानोरा मार्गावर मोहली गाव आहे. वादळ एवढे प्रचंड होते की, गावातील वीज खांब वाकले. त्यामुळे वीज तारा तुटल्या. अनेकांच्या घरांवरील टिनाचे छप्पर, कवेलु उडून गेले. नामदेव गावडे यांच्या घरावरील टिनाचे २४ नग, सिमेंटचे चार पत्रे उडून गेले. छत उडाल्याने पावसाचे पाणी घरात पडले. घरात साठविलेले धान्य खराब झाले. गावडे यांचे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. यादव जयराव हुर्रा यांच्या घरा शेजारी असलेले विद्युत खांब घरावर पडले. यामध्ये जवळपास सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. रवींद्र गणपत तिरंगम यांच्या घराची पडझड झाली. नुकसानीचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सरपंच भागरथाबाई गावडे, उषा नरचुलवार, पोलीस पाटील प्रकाश मुनघाटे, रमेश मेश्राम, सुशीला गावडे, नामदेव गावंडे, यादव हुर्रा, रवींद्र तिरंगम यांनी केली आहे.