आष्टीला वादळाचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:11 AM2019-04-13T00:11:39+5:302019-04-13T00:12:05+5:30
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी येथे वादळवारा व मेघगर्जनेसह पावसाला अचानक सुरूवात झाली. वादळामुळे चंद्रपूर मार्गावरील मोठमोठी तीन झाडे कोसळली. आठवडी बाजारासाठी आलेल्या दुकानदार व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आष्टी येथे वादळवारा व मेघगर्जनेसह पावसाला अचानक सुरूवात झाली. वादळामुळे चंद्रपूर मार्गावरील मोठमोठी तीन झाडे कोसळली. आठवडी बाजारासाठी आलेल्या दुकानदार व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.
दिवसभर कडक ऊन असल्याने सायंकाळी पाऊस येईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली. विशेष म्हणजे, सोसाट्याचा वारा वाहत होता. यामुळे चंद्रपूर मार्गावरील तीन झाडे कोसळली. झाडाखाली असलेली रवी चेलीयालवार यांची कार क्षतिग्रस्त झाली. त्यांच्या कारचे काच फुटले तसेच कारचा समोरचा भागही दबला. वीज खांबावर झाड पडल्याने ५ वाजतापासूनच वीज पुरवठा खंडीत झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वादळ शांत होताच वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला सुरूवात केली. आंबेडकर चौकातील बारापात्रे यांच्या घरासमोरील फार जुने झाड कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
शुक्रवारी आष्टी येथे आठवडी बाजार भरते. गावखेड्यातून शेकडो नागरिक भाजीपाला व इतर साहित्य घेण्यासाठी आठवडी बाजारात आले होते. त्यामुळे चंद्रपूर मार्गावर वाहन व नागरिकांची वर्दळ होती. दुकानासाठी बांधलेल्या ताडपत्री उडून गेल्या. अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांच्या घरावरील कवेलू व टिनाची पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले.