वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 11:43 PM2018-05-03T23:43:33+5:302018-05-03T23:43:33+5:30

बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व मुसळधार अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले.

Stormy rain | वादळी पावसाचा तडाखा

वादळी पावसाचा तडाखा

Next
ठळक मुद्देजिल्ह्याच्या दक्षिण भागाला फटका : घरांचे नुकसान, अहेरीतील रस्त्यांवर गुडघाभर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये झालेल्या जोरदार वादळ व मुसळधार अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले.
अहेरी : येथे गुरूवारी सकाळी विजेच्या कडकडाटासह वादळ व पावसाला सुरूवात झाली. जोरदार वादळामुळे अहेरी शहरातील अनेक दुकानांची फलके तुटून पडली. को-आॅपरेटी बँक परिसरातील चिमरालवार, जाधव यांच्या दुकानात, घरात, मुख्य रस्त्यावरील आर्इंचवार यांच्या कपड्याच्या दुकानात तसेच घरात, आदिवासी विकास महामंडळ, ट्रेझरी कार्यालय येथे पावसाचे पाणी शिरले. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. अहेरी बायपास मार्गावरील विजेची तार तुटून पडल्याने अहेरी शहराचा वीज प्रवाह खंडीत झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेकांच्या चारचाकी व दुचाकी बंद पडल्या. शहरवासीयांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला. अहेरी येथील राजवाडा मार्गावरील स्वयंम अपार्टमेंटजवळील एक झाड किशोर सडमेक यांच्या घरावर कोसळले. घर स्लॅबचे असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मंडळ अधिकारी जनार्धन अन्नदेलवार, तलाठी व्यंकटेश जल्लेवार, कोतवाल विनोद इसनकर यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात बुधवारी रात्री जोरदार वादळ झाले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे, कवेलु, टिन उडाले. विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने रात्रीच विद्युत पुरवठा खंडीत झाला. ताटीगुडम येथील शंकर व्यंकटी आलाम यांच्या घरावरील छत कोसळल्याने घराचे नुकसान झाले.
जिमलगट्टा : जिमलगट्टा येथे गुरूवारी रात्री जोरदार वादळ झाले. त्यामुळे या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला. जिमलगट्टा येथील बालचा येलकुची यांच्या चक्कीवरील छप्पर उडाले. जिमलगट्टा येथून १० किमी अंतरावरील येंकाबंडा येथील किष्टय्या बापू टेकाम यांच्या घरावर मोठे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले. घरातील एक क्विंटल तांदूळ, १० क्विंटल धान, मोह, मूग, भांडे आदींचे जवळपास एक लाख रूपयांचे नुकसान झाले. याची माहिती तलाठी एस. डब्ल्यू. दखणे यांना देऊन पंचनामा करण्यात आला. जंगलात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देचलीपेठा, उमानूर भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.
एटापल्ली : एटापल्ली येथे ११.३० ते १२ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. एटापल्ली तालुक्यातील काही शेतकरी आवत्या टाकतात. जमीन नांगरता येणार आहे.
कोरची : कोरची तालुक्यात गुरूवारी सकाळपासून पावसाच्या मध्यम सरी पडल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. कोरची तालुक्यातही बुधवारी रात्री काही भागात वीज गर्जनेसह पाऊस झाला.
सिरोंचा : सिरोंचा येथे बुधवारी रात्री व गुरूवारी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. सिरोंचा-नगरम मार्गावरील दूरसंचार कार्यालयासमोरील मेकॅनिकल शॉपवर कडूनिंबाचे झाड उन्मळून घरावर पडल्याने घराचे नुकसान झाले. वीज पुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली.
भामरागड : भामरागड तालुक्यात गुरूवारी सकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वेळेवर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. वादळ झाल्यामुळे भामरागड तालुक्याचा वीज पुरवठा दुपारीच खंडीत झाला. काही भागातील वीज तारांवर झाड कोसळल्याने सायंकाळीही वीज पुरवठा बंदच होता.
२४ तासात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली जिल्ह्यात तसेच विदर्भात पुढील ४८ तासात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आकाशात ढग असताना व पाऊस सुरू असताना झाडाखाली आश्रय घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यातील काही भागात उन्हाळी धानाचे उत्पादन घेतले जाते. उन्हाळी धानपीक कापले आहे. अशातच पाऊस झाल्याने धानाच्या कडपांमध्ये पाणी शिरले. यामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी पाऊस सुरूच राहिल्यास धान पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Stormy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस