झाडांच्या फांद्यांनी झाकोळले पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:54 AM2021-02-05T08:54:43+5:302021-02-05T08:54:43+5:30
शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. ...
शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने, या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही. परिणामी, योजनांपासून अनेक शेतकरी वंचित आहेत.
अगरबत्ती बनविण्याच्या मजुरी दरात वाढ करा
गडचिरोली : वनविभागाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पांमध्ये शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र, अगरबत्ती बनविण्याचा दर अत्यंत कमी असल्याने मजुरांना कमी मजुरी मिळत आहे. मजुरी वाढविण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.
अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करा
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई होत नसल्याने अल्पवयीन वाहनचालकाचे प्रमाण वाढले आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एसटीला फटका
अहेरी : जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोन आगारांमार्फत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा संपूर्ण जिल्ह्यात चालविली जाते. गडचिरोली आगाराच्या १०५ व अहेरी आगाराच्या ६५ बसगाड्या दुर्गम भागात धावतात. मार्गावरील खड्ड्यांमुळे एसटीचे नुकसान होत आहे.
पं.स. परिसरातील प्रसाधनगृहाची दुरवस्था
आरमाेरी: स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, स्वच्छतेकडे पं.स. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीत ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येतात. प्रसाधनगृह स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल, त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
जननी शिशू सुरक्षा योजनेची जनजागृती करा
गडचिरोली : शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या जननी शिशू सुरक्षा योजनेचा अनेक ठिकाणी फज्जा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. आरोग्य विभागामार्फत या योजनेची प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने योजना मर्यादित आहे.
धोडराज मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच किमी अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली आहे. धोडराजवासीय भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
काेरची: स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
प्रवाशी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
रांगी: परिसरात प्रत्येक गावी प्रवाशी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या प्रवाशी निवाऱ्यांकडे एसटी विभाग व शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. त्यामुळे प्रवासी रस्त्यावर थांबून बसची वाट बघत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा.पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजना महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. पुरुषांमध्ये सदर कुटुंबनियोजनाच्या नसबंदीबाबत गैरसमज असल्याने ते पुढे येत नाही.
लोहारा-रांगी मार्गावरील झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वन विभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते. मात्र, याकडे दुर्लक्ष झाले आहे.
कमलापूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा कुचकामी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी, जनता त्रस्त झाली आहे.
आश्रमशाळेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, अहेरी, भामरागड प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. त्यामुळे आश्रमशाळांच्या सोईसुविधांवर परिणाम होत आहे. त्यामुळे आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. सदर रस्ते दुरुस्त करावे. त्याचबरोबर, नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
आरमोरीत सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधा
देसाईगंज : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहाचा अभाव असल्याने घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.