नगर परिषद व महामार्गाच्या वादात अडकले पथदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2021 05:00 AM2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:38+5:30
नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहरातील पथदिव्यांचे काम नॅशनल हायवे विभागाने याेग्य पद्धतीने केले नसल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेने या पथदिव्यांचा ताबा स्वत:कडे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब लावण्याचे काम तीन महिन्यांपासून पूर्ण हाेऊनही त्यावर पथदिवे लागू शकले नाहीत. परिणामी, शहरवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे. वास्तविक, या ठिकाणी पाइप टाकून त्यामध्ये केबल टाकणे आवश्यक हाेते. मात्र असे करण्यात आले नाही. भविष्यात केबल तुटल्यास नगर परिषदेला फार माेठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार सदर काम सदाेष आहे. काम सदाेष असताना त्याचा ताबा घेण्यास नगर परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब उभारून आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. शहरातून प्रशस्त राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे. रात्री व पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरण्यासाठी जातात. मात्र नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ताबा घेण्यासंदर्भात नॅशनल हायवेने नगरपालिकेला पत्र दिल्यानंतर सदाेष कामासंदर्भात चर्चा उत्तर देण्यासाठी नगर परिषदेने १७ ऑगस्ट व १ सप्टेंबर राेजी दाेनवेळा पत्र दिले आहे. मात्र पत्राचे उत्तर दिले नाही, असा आराेप नगर परिषद प्रशासनाने केला आहे.
मीटरच्या मागणीचा अर्जही केला नाही
पथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर बसवावा लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदेने महावितरणच्या नावाने अर्ज तयार करून ठेवला आहे. मात्र सदाेष कामाचा तिढा अजूनपर्यंत सुटला नाही. त्यामुळे मीटरच्या मागणीचा अर्ज महावितरणकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे पथदिवे लागण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल हे अनिश्चित आहे.