खेड्यात आरोग्यसेवा बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 01:25 AM2016-05-13T01:25:13+5:302016-05-13T01:25:13+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या आरोग्य सेवेत परिचारिकांचे प्रचंड महत्त्व आहे.

Strengthen healthcare in the village | खेड्यात आरोग्यसेवा बळकट करा

खेड्यात आरोग्यसेवा बळकट करा

Next

शंतनू गोयल यांचे आवाहन : जागतिक परिचारिकादिनी नर्सेससह वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या आरोग्य सेवेत परिचारिकांचे प्रचंड महत्त्व आहे. आरोग्य विभागाने अर्भक, माता मृत्यूचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी केले आहे. जिल्हाभरातील परिचारिकांनी ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्याबाबत जनजागृती करून मलेरिया रोगाचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच ग्रामीण भागात आरोग्यसेवा बळकट करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान तथा आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित जागतिक परिचारिका दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्रांना डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच आरोग्य सेवेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन आरोग्य सहायिकांना तसेच आरोग्य सेविकांना फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना शंतनू गोयल म्हणाले, मलेरियाचा प्रभाव कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मच्छरदाणी वाटप करण्यात येणार आहे. सदर मच्छरदाणीचा चांगला वापर होण्यासाठी परिचारिका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ग्रामीण व दुर्गम भागात जनजागृती करावी. जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट म्हणाले, आरोग्यसेवा ही अत्यावश्यक व महत्त्वाची सेवा आहे. आजारी रुग्णाला बरे केल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणारा आनंद मोठा असतो. त्यामुळे परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात आरोग्यसेवेचे प्रामाणिकपणे काम करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी यांनी वर्षभरात जि. प. आरोग्य विभागामार्फत ग्रामीण व दुर्गम भागात करण्यात आलेल्या आरोग्य सेवेचा आढावा यावेळी मांडला. तसेच संस्थांतर्गत प्रसूती वाढविण्यासाठी परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन सोनाली जोगदंड यांनी केले तर आभार जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांनी मानले. कार्यक्रमाला एनआरएचएमचे कार्यक्रम व्यवस्थापक अनुपम महेश गौरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळवे व जि. प. नर्सेस संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)

फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कारानेही परिचारिकांचा सन्मान
जि. प. च्या आरोग्य विभागाने आरोग्य सेवेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन आरोग्य सहायिका व तीन आरोग्यसेविका यांना फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार लता कोत्तावार, आरोग्य सहायिका प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल, द्वितीय पुरस्कार लीलाबाई शेंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र अडपल्ली व तृतीय पुरस्कार पी. एस. गिरी, प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगी यांचा समावेश आहे. तीन उपकेंद्रातील तीन आरोग्य सेविकांना फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये दीक्षा ढोंगळे, आरोग्य उपकेंद्र अडपल्ली, शोभा चौधरी, आरोग्य उपकेंद्र कोंढाळा व एच. एन. गोमेकर, आरोग्य उपकेंद्र कोटगुल यांचा समावेश आहे.

पुरस्कारात प्रथमच धनादेशाचा समावेश
जि. प. आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी जागतिक परिचारिका दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मात्र यंदा प्रथमच पुरस्कारामध्ये धनादेशाचा समावेश करण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या आरोग्य केंद्राला २५ हजार, द्वितीय पुरस्कार पटकाविणाऱ्या केंद्राला १५ हजार व तृतीय पुरस्कार पटकाविणाऱ्या केंद्राला १० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार पटकाविणाऱ्या उपकेंद्राला १५ हजार, द्वितीय पुरस्कार पटकाविणाऱ्या उपकेंद्राला १० हजार व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविणाऱ्या उपकेंद्राला ५ हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. फ्लॉरेंस नायटिंगल पुरस्कार मिळविणाऱ्या आरोग्य सहायिका व आरोग्य सेविकांना अनुक्रमे ४ हजार, ३ हजार व २ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.

आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचा गौरव
डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र पोटेगाव, द्वितीय पुरस्कार प्राथमिक केंद्र देलनवाडी व तृतीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र मालेवाडा यांना देण्यात आला. डॉ. आनंदीबाई जोशी प्रथम पुरस्कार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गिलगाव (बा.), द्वितीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मारोडा व तृतीय पुरस्कार प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोपरअली यांना प्रदान करण्यात आला.

Web Title: Strengthen healthcare in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.