स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 10:28 PM2018-05-12T22:28:13+5:302018-05-12T22:28:13+5:30
विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी ......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून रणांगणात उतरलेले डॉ.रामदास आंबटकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनेक प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांना बळकट करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचा मनोदय शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.
दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजपच्या मतदारांचे प्राबल्य असले तरीही कोणत्याही लढाईत शत्रुला कमी लेखू नये, म्हणून ही निवडणूक आपण गांभिर्याने लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असलेले विद्यमान आमदार भाजपचेच आहे, पण त्यांनी गेल्या सहा वर्षात गडचिरोलीकरांची चांगलीच निराशा केली. असे असताना मतदार तुम्हाला स्वीकारतील का? असा प्रश्न केला असता गडचिरोली माझ्यासाठी नवीन नसून येथील विविध प्रश्नांची मला माहिती आहे. त्यामुळे गडचिरोलीकडे विशेष लक्ष राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषत: नवीन नगर पंचायतींचा कारभार कसा चालवावा याचे प्रशिक्षण, तसेच अधिकारांची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी खासदार अशोक नेते यांनी डॉ.आंबटकर यांच्या विजयाची पूर्ण खात्री दिली. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीत आणण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी म्हणून आंबटकर यांनी कसे योगदान दिले याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आमदार डॉ.देवराव होळी, भाजपचे जिल्हा महामंत्री रवी ओललवार, डॉ.भारत खटी, नगरसेवक प्रमोद पिपरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी पक्षीय मतदारांचे संख्याबळ पाहता भाजपचे प्राबल्य असले तरी जास्त रिस्क न घेता तळ्यात-मळ्यात करणाºया काही मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्नही भाजपाकडून सुरू आहे.
भाजपचे मतदार जाणार सहलीला
या निवडणुकीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायतचे सदस्य असलेले अनेक मतदार उमेदवारांकडून मलिदा मिळण्याची आस लावून बसलेले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून भाजपची यंत्रणा त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सहलीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने ते भाजपशासित एखाद्या राज्यात सहलीसाठी निघणार आहेत. त्यांची चांगली व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित राज्याच्या सत्ताधारी पदाधिकाºयांकडे दिली जाणार असल्याचे समजते.