न्यायाधीशांना पत्र पाठवून जनहित याचिकेला बळ द्या
By Admin | Published: March 13, 2016 01:23 AM2016-03-13T01:23:34+5:302016-03-13T01:23:34+5:30
शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, ...
पत्रकार परिषद : शंकर धोंडगे यांचे आवाहन
गडचिरोली : शेतकऱ्यांची संपूर्ण शेती कर्जातून मुक्तता करण्यात यावी, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुराला दरमहा पाच हजार रूपये पेन्शन देण्यात यावी, उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा अशी किंमत शेतमालाला देण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांना धरून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीशांना (नागपूर खंडपीठ) यांना पत्र पाठवावे, असे आवाहन शेतकरी, शेतमजूर कृती समितीचे संयोजक शंकर धोंडगे यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
राष्ट्रवादी किसान सभेची बैठक जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माहिती देताना शंकर धोंडगे म्हणाले की, संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे चारा व पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे सततच्या नैराश्याने शेतकरी वर्ग आत्महत्या करीत आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या न्याय व हक्कासाठी न्यायालयीन लढाही लढण्याच्या उद्देशाने औरंगाबाद खंडपीठात ५ जानेवारी २०१६ रोजी घटनेच्या कलम २१ अन्वये शेतकरी, शेतमजुरांना माणूस म्हणून जीवन जगण्याच्या मूलभूत अधिकारावर सरकारकडून अडथळा निर्माण केला जात असल्याबद्दल पुराव्यानिशी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने चार आठवड्यात सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजुने लागण्यासाठी मुख्य न्यायाधीशांना शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे. पत्राचा नमुना व लिपाफा तयार करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केवळ पत्राच्या खाली स्वत:चे नाव, गाव, पत्ता लिहून सही करायची आहे व स्वत:कडचे पाच रूपये खर्च करून पोस्टाचे तिकीट चिकटवायचे आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पत्र पाठवावे, असे आवाहन शंकर धोंडगे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला किसानसभेचे राज्यकार्यवाह किशोर माथनकर, दत्ता पवार, पक्षनिरिक्षक राजू वैद्य, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, किसानसभेचे अध्यक्ष प्रकाश ताकसांडे, अॅड. संजय ठाकरे, माजी जि.प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)