अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:35 AM2021-02-13T04:35:58+5:302021-02-13T04:35:58+5:30
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य संताेष साळुंके. गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने ...
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य संताेष साळुंके.
गडचिरोली : आपल्या देशात रस्त्याच्या लांबीबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली; पण त्यामानाने लोकांकडून आवश्यक प्रमाणात रस्ता सुरक्षा नियमांचे पालन होताना दिसत नाही. पर्यायाने दरवर्षी पाच लाख लोकांचे अपघात रस्त्यांवर घडतात. त्यांपैकी दीड लाख लोकांना आपला प्राण गमवावा लागतो, ही बाब चिंताजनक आहे. म्हणून अपघातविरहित जीवनासाठी रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले.
गडचिराेली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस शाखा यांच्यातर्फे संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी संस्थेच्या परिसरात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते. याप्रसंगी नॕॅशनल हायवे अथाॅरिटीचे कार्यकारी अभियंता विवेक मिश्रा, शाखा अभियंता आशिष आवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, जिल्हा वाहतूक शाखेच्या गोरे, माेटार वाहन निरीक्षक शफिक उचगावकर, चेतन पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कावळे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी विवेक मिश्रा आणि शफिक उचगावकर यांनी रस्ते नियम आणि नागरिकांची जबाबदारी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. रासेयाे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी प्रास्ताविक, संतोष बोंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर विवेक गढे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक, तसेच कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.