जारावंडीत कडकडीत बंद, आरोग्य केंद्राला ठोकले टाळे
By संजय तिपाले | Published: March 11, 2024 06:52 PM2024-03-11T18:52:07+5:302024-03-11T18:52:35+5:30
संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
गडचिरोली : पाच वर्षांच्या चिमुकलीवर शासकीय निवासस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केल्याची घृणास्पद घटना १० मार्च रोजी एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली होती. याचे तीव्र पडसाद जारावंडी येथे ११ मार्चला उमटले. संतप्त ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढत टाळे ठोकले. यावेळी नराधमाला फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) याने ५ वर्षांच्या मुलीला शासकीय निवासस्थानी नेऊन कुकर्म केले होते. संतोष कोंडेकर हा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई आहे. दरम्यान, कुकर्म करताना एका मुलीने पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे
मुलीवर तत्काळ उपचार मिळाले नाहीत. तिला गडचिरोलीला आणावे लागले, सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.
पीडितेच्या आईच्या जबाबावरून बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ मार्च रोजी जारावंडी येथे कडकडीत बंद पाळून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडकल्यानंतर दरवाजाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मोर्चात आरोपीला फाशीची शिक्षा द्या.. अशी जोरदार घोषणाबाजी करून परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
आरोपी जेरबंद
दरम्यान, या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी संतोष कोंडेकरला ११ मार्च रोजी जारावंडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास १२ मार्च रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी सांगितली.