आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा होईल कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 03:26 PM2024-10-17T15:26:47+5:302024-10-17T15:29:42+5:30
विभाग प्रमुखांची बैठक : कर्मचाऱ्यांनी १०० टक्के मतदान करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. प्रत्येकाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच सोपविलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी दैने बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक कामासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहावे व कोणत्याही विभाग प्रमुखाने जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये अथवा रजेवर जाऊ नये असे निर्देशही दैने यांनी दिले. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे वाचन करून त्यानुसारच त्याची अंमलबजावणी करावी. कार्यालय व परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन फलक, कोनशिला, राजकीय व्यक्तींची छायाचित्रे व पक्षाची चिन्हे असलेले बॅनर, होर्डिंग्ज तात्काळ काढण्यात यावे. रस्ते व सार्वजनिक जागेवर प्रचार साहित्य लागणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या. निवडणुकीच्या तसेच अत्यावश्यक सेवेत कर्तव्यावर असलेले कोणताही कर्मचारी पोस्टल बॅलेट मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित कार्यालय प्रमुखांनी घ्यावी. यासाठी कार्यालयात एक समन्वयक अधिकारी नेमून मतदानासाठीचे विहित फॉर्म भरून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.
तत्काळ नोंदणी करण्याचे आदेश
जिल्ह्यात कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करून घ्यावी. ज्यांची मतदार नोंदणी इतर जिल्ह्यात आहे मात्र ते आता या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांनीही आपली मतदार नोंदणी गडचिरोलीत स्थलांतरित करण्यासाठी अर्ज करावे व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी १०० टक्के मतदान करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या.